मुंबई - निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. हिंदी भाषेमध्ये बनत असलेल्या आगामी चित्रपटासाठी त्यानं अभिनेत्री नुश्रत भरुच्चा आणि निर्माता विशाल राणा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. काही दिवसापूर्वी अनुरागनं हिंदी चित्रपटाला राम राम ठोकून साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीकडे जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. या पार्श्वभूमीवर त्यानं या आगामी चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
बॉलिवूड चित्रपटांचे समीक्षक आणि ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या लेटेस्ट पोस्टमधून ही माहिती कळवली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "नुश्रत भरुच्चा, अनुराग कश्यप आणि विशाल राणा एका थ्रिलर चित्रपटासाठी एकत्र आले आहेत... निर्माता विशाल राणा यांच्या एकेलॉन प्रॉडक्शन्सच्या वतीनं निर्मित या आगामी थ्रिलरमध्ये नुश्रत भरुच्चा मुख्य भूमिका साकारणार आहे, तर अनुराग कश्यप क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचं लवकरच चित्रीकरण सुरू होईल."
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवं दिग्दर्शक असलेला, सातत्यानं स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेणारा अनुराग कश्यप यानं 2024 साल संपण्यापूर्वीच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. अनुराग कश्यपनं मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. एका मुलाखतीत त्यानं हा धक्कादायक खुलासा केला होता. अनुरागनं या मुलाखतीत मुंबई सोडण्यामागचं कारणही सांगितलं होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये रिस्क फॅक्टर कमी होत असून बॉलिवूड रिमेकवर अवलंबून होत असल्याची चिंताही अनुरागनं व्यक्त केली होती.
या मुलाखतीत अनुरागनं मुंबई सोडण्यामागचं कारण सांगतानं म्हटलं होतं की, "चित्रपट बनवण्याची क्रेझ माझ्यापासून दूर होत चालली आहे, आजच्या काळात मी बाहेर जाऊन कोणताही वेगळा चित्रपट बनवू शकत नाही, कारण चित्रपट बनण्याआधीच विक्रीची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे आता मी याला कंटाळलो आहे. चित्रपट बनवण्याची इच्छा संपली आहे, म्हणून मी मुंबई सोडून पुढच्या वर्षी दक्षिणेला जात आहे, मला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे मला काम करण्याचा आनंद मिळेल. नाहीतर मी म्हाताऱ्या माणसासारखा मरेन, मी माझ्या चित्रपटसृष्टीच्या विचारांनी मी अस्वस्थ झालो आहे."
त्याच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यानं आगामी थ्रिलर चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानं त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.