मुंबई - Ankita Lokhande :अभिनेत्री अंकिता लोखंडेचे चाहते 'बिग बॉस 17'मध्ये ती न जिंकल्यामुळे नाराज झाले आहेत. अनेकजण तिला बिग बॉसच्या ट्रॉफीचा दावेदार मानत होते. ट्रॉफी न जिंकूनही ती स्टार म्हणून शोमधून बाहेर पडली आहे. या शोमधून बाहेर येताच तिचे नशीब खूप चमकले आहे. कारण लवकरच अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करणार आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्वातंत्र्य वीर सावरकर' अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अंकिता आगामी देशभक्तीपर चित्रपटात रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
अंकिता लोखंडे करणार कमबॅक : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत होते. दरम्यान, आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, कारण रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मोठ्या पडद्यावर बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी येत आहे. अंकिता लोखंडेच्या 'बिग बॉस 17'मधील कठीण प्रवासानंतर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यामातून ती नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकेल. यापूर्वी अंकितानं 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटामध्ये तिने झलकारी बाईची भूमिका केली होती. तिची ही दमदार भूमिका सर्वांना आवडली.