अमरावती : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या करजगाव या ठिकाणी भक्कम तटबंदी असणारा किल्ला आज भग्नावस्थेत आढळतो. निजामशाहीत हा भाग अतिशय समृद्ध गणला जायचा. व्यापारी केंद्र असणाऱ्या या परिसरात 1806 मध्ये विठ्ठल भागदेव या निजामाच्या सामंतानं हा किल्ला उभारला. पितळ आणि तांब्याच्या वस्तू निर्माण करणारं केंद्र म्हणून हा किल्ला ओळखला जायचा. समृद्ध असणारा हा किल्ला पुढे किल्लेदाराला गहाण ठेवावा लागला. निजामशाहीचा साक्षीदार असणाऱ्या ह्या किल्ल्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपार्ट.
हजार रुपये खर्चून उभारला किल्ला : व्यापारी केंद्र असणाऱ्या करजगाववर नियंत्रण ठेवण्यासाठी निजामांनी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला हैदराबाद येथील मूळ रहिवासी असणारे विठ्ठल भगदेव यांना या परिसरात पाठवलं, असं इतिहास सांगतो. करजगाव येथील जहागिरी सांभाळत असताना विठ्ठल भगदेव यांनी 1806 मध्ये एक हजार रुपये खर्चून वाळूच्या उत्कृष्ट दगडांनी किल्ला उभारला. या किल्ल्याची बांधणी अतिशय सुबक आहे. लाल दगडांपासून किल्ल्याचा जोथा बांधण्यात आला आणि त्याच्या वरचं बांधकाम हे दगडी विटा आणि मातीपासून करण्यात आलं. जंग्या, चरिया आणि फर्जा या किल्ल्यांच्या वास्तूमधील प्रमुख वैशिष्ट्य या किल्ल्यात देखील आहे. किल्ल्याच्या आतमधील संपूर्ण बांधकाम हे सागवान लाकडाद्वारे करण्यात आलं असल्याची माहिती स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे गड किल्ल्याचे अभ्यासक शिवा काळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
किल्ल्याला दोन दरवाजे : या किल्ल्याच्या पूर्वेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असून दक्षिण दिशेला एक छोटसं दार आहे. किल्ल्याच्या बुरुजाची उंची 50 फूट असून किल्ल्याच्या मागच्या बाजूला सर्वात उंच बुरुजाला फुलांच्या पाकळ्यांचा आकार आहे. यामुळं हा बुरुज पखली बुरुज म्हणून ओळखला जायचा. आज हा बुरुज मोडकळीस आलेला दिसतो.
किल्ल्याभोवती बगीचा : या किल्ल्यात विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीला किल्ल्यालगत सातपुडा पर्वतातून वाहत येणाऱ्या बहूर्डा नदीच्या पात्रातून पाण्याचे झरे लागले आहेत. विहिरीमुळं भरपूर पाणी उपलब्ध झाल्यानं हा किल्ला किल्ल्याच्या परिसरात विस्तृत बागांची लागवड करण्यात आली. किल्ल्याच्या परिसरात सुपीक जमिनीवर शेती केली जायची. या ठिकाणची मिर्ची आज देखील अतिशय प्रसिद्ध आहे.
तांबे आणि पितळेच्या भांड्यांचं मुख्य केंद्र : करजगाव या ठिकाणी किल्ला उभारल्यावर किल्ल्याच्या आतमध्ये तांबे आणि पितळेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा. तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंची भांडी तयार करण्याचा व्यवसाय या किल्ल्यातच भरभराटीस आला. तांबे आणि पितळीची भांडी मिळणारं वऱ्हाडातील प्रमुख केंद्र म्हणून करजगाव ओळखलं जायचं. आज देखील बहिरमच्या यात्रेत तांबे आणि पितळीच्या भांड्यांचे व्यावसायिक मोठ्या संख्येनं करजगाव येथील रहिवासी आहेत.
हा किल्ला ठेवावा लागला गहाण : खरंतर करजगाव येथे विठ्ठल भगदेव यांनी किल्ला उभारल्यावर करजगाव आणि लगतच्या परिसरानं भरभराटीचा काळ पाहिला. कालांतरानं मात्र आर्थिक अडचणींमुळं वृद्धापकाळात विठ्ठल भगदेव यांना हा किल्ला सराफा व्यावसायिकाकडं गहाण ठेवावा लागला. इथूनच या किल्ल्यासह या परिसराच्या भरभराटीला उतरती कळा लागली. यामागचं नेमकं कारण इतिहासात कुठंही स्पष्ट होत नाही अशी माहिती शिवा काळे यांनी दिली.
1936 मध्ये विष्णुपंत सराफ यांनी किल्ल्याची केली खरेदी : विठ्ठल भगदेव यांच्या मुलांचा उल्लेख इतिहासात सापडत नाही, मात्र त्यांच्या सुनेचा उल्लेख आहे. भागीरथीबाई असं विठ्ठल भगदेव यांच्या सुनेचं नाव होतं. गहाण असणारा किल्ला सोडवण्यासाठी हवे तितके पैसे नव्हते आणि आर्थिक अडचणींमुळं भागीरथीबाई यांनी करजगावचा हा किल्ला 1936 मध्ये गावातील विष्णुपंत श्रीकृष्ण सराफ यांना विकला. या किल्ल्याची त्यावेळेस एक हजार रुपयात खरेदी केली होती. हे खरेदी खत आम्ही पुण्यातून आणलं असल्याची माहिती विष्णुपंत सराफ यांचे नातू आशिष सराफ यांनी दिली. हा किल्ला विकल्यावर भागीरथीबाई या लागतच असणाऱ्या ब्राह्मणवाडा थडी या गावात वास्तव्यास होत्या. त्यानंतर मात्र त्यांच्या संदर्भात माहिती नाही असा आशिष सराफ म्हणाले.
1940 मध्ये जळाला किल्ला : 1940 मध्ये या किल्ल्याला अचानक आग लागली. या आगीमुळं किल्ल्यात असणारं सागवानी लाकडाचं संपूर्ण बांधकाम जळालं. यानंतर किल्ल्याचे मालक विष्णुपंत सराफ हे करजगाव येथून अचलपूरला राहायला गेले. विष्णुपंत सराफ यांच्या निधनानंतर 1986 मध्ये या किल्ल्याची अधिकृत मालकी त्यांचे पुत्र कृष्णराव सराफ यांच्याकडं आली असल्याचं, कृष्णराव सराफ यांचे पुत्र आशिष सराफ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -