मुंबई - Ankita lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कधी सुशांत सिंह राजपूत तर कधी तिच्या सासूमुळे अंकिता चर्चेत राहते. 'बिग बॉस 17' मध्ये ती तिचा पती विकी जैनबरोबर दिसली होती. या शोमध्ये या जोडप्यामध्ये खूप भांडणं पाहायला मिळाली होती. अंकिता लोखंडे तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या सासूनं भांडणादरम्यान मुलगा विक्की जैनला पाठिंबा दिला. यानंतर सासू रंजना जैननं तिला बिग बॉस शोमध्ये येऊन खूप सुनावलं होतं. आता पुन्हा एकदा 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
अंकिता लोखंडेच्या सासूबाईंचे मनपरिवर्तन : बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची सासू खूप चर्चेत आली. या शोमध्ये सासूचा रागीट चेहरा लोकांना पाहिला मिळाला होता. अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान रंजना जैननं आपल्या सुनेचं खूप कौतुक केलं. तेव्हा अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान अंकितानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या सासूबरोबर दिसत आहे. दोघींना एकत्र पाहून यूजर्स कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकानं लिहिलं, "हे हृदयपरिवर्तन कसे आणि केव्हा झाले?.", तर दुसऱ्यानं कमेंट केली, "अरे, हे काय चालले आहे, कधीही ही बाई आपल्या सुनेबद्दल वाईट बोलते." आणखी एकानं लिहिलं, "अंकिता किती नाटक करते? "