मुंबई - 'भूल भुलैया 3' चे निर्माता आणि दिग्दर्शक अनीस बज्मी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे. अनेक अडथळे पार करत त्यांनी या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली असून ठरल्या प्रमाणे यंदाच्या दिवळीला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात त्यांना यश मिळत आहे. यावर्षी या 'भूल भुलैया 3' ची बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' या मल्टीस्टारर चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे.
खरंतर अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैया 3' हा चित्रपट एका पायावर बसून तयार केला आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याच्या आठवडाभर आधी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर डॉक्टरांनी 4 ते 6 महिने विश्रांतीचा सल्ला देऊनही, बज्मी यांनी आपला चित्रपट निर्मितीचा हट्ट सोडला नाही. दिवाळीला चित्रपट रिलीज करायचाच हा निर्धार करुनच ते शूटिंगच्या तयारीला लागले होते. "जर मी शूटिंगला उशीर केला असता तर आमची तारीख चुकली असती," असं अनीस बज्मी यांच्या टीमनं शेअर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
अनीस बज्मी यांना विश्वास होता की घरी बसलो तरी पायाची दुखापत काही पूर्ण बरी होणार नाही, त्यापेक्षा काम करत राहण्याचा पर्याय त्यांनी निवडला. "मला असंही वाटलं की जर घरी राहिलो तरीही मी काही लवकर बरे होणार नाही. शूटिंग सुरू करण्याच्या माझ्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. मला खूप वेदना होत होत्या, पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या खुर्चीत बसून अर्ध्याहून अधिक चित्रपट पूर्ण केलं.," असं त्यांनी पुढं म्हटलंय.
त्याअगोदर एएनआयशी झालेल्या चर्चेच्यावेळी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं आणि विद्या बालनबरोबरचा काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. त्यानं शेअर केले की, "ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. या चित्रपटात तिनं खूप मेहनत घेतली आहे. मला ती प्रत्येक चित्रपटात आवडते. पण या चित्रपटात तिने इतके सुंदर काम केलं आहे की मी तिचा चाहता झालो आहे. तिच्याबरोबर काम करण्याचा हा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही आणि शेवटच्या दिवशी आम्ही खूप मजा केली होती..."