मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुन यानं 'पुष्पा 2' मधील रियल श्रीवल्ली रश्मिका मंदान्नाबरोबरचा एक सेल्फी चाहत्यांसाठी पोस्ट केलाय. त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रश्मिका एका खाजगी जेटमध्ये अल्लू अर्जुनबरोबर सेल्फी क्लिक करताना दिसत आहे.
ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ते त्यांच्या क्रूसह पाटणाला रवाना झाले तेव्हा हा फोटो क्लिक करण्यात आल्याचे दिसते. या फोटोसाठी अल्लू अर्जुननं लिहिलंय, "खऱ्या श्रीवल्लीबरोबर एक संस्मरणीय वेळ". रश्मिकाने देखील अल्लूची ही पोस्ट पुन्हा शेअर केली आणि त्यावर लिहिले, "पुष्पाबरोबर माझा वेळ नेहमीच मजेदार जातो."
अल्लू अर्जुन बरोबर रश्मिका मंदान्नाबरोबरचा सेल्फी (ANI) अलीकडेच 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलरसाठी भव्य लॉन्चिंग सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जून आणि रश्मिका पुन्हा एकदा पुष्पा आणि श्रीवल्लीची भूमिका साकारत आहेत. यात त्याची एन्ट्री जबरदस्त दाखवण्यात आली आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही भरपूर चटपटीत डॉयलॉगची बरसात झाली आहे. "पुष्पा नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बडा.." आणि "पुष्पा सिर्फ एक नाम नहीं है..पुष्पा मतलब एक ब्रँड.." असे मनोरंजक संवाद प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारे आहे. फहद फसिलही यामध्ये 'पुष्पा'चा शत्रू बनल्याचं दिसत आहे. दोघांच्यातील टोकाचा संघर्ष सिनेमाचं मोठं आकर्षण असेल.
अल्लू अर्जुन बरोबर रश्मिका मंदान्नाबरोबरचा सेल्फी (ANI) 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी रविवारी बिहारमधील पाटणा येथील गांधी मैदानावर एक भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित केला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना पाहण्यासाठी उत्सुक होते आणि व्हिडिओमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आणि उत्साह दिसून आला आहे. 'पुष्पा 2: द रुल' च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची झलक पाहण्यासाठी पाटणा येथील गांधी मैदानावर जमलेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज देखील करावा लागला होता. काही प्रेक्षक तर अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी पाटण्यातील गांधी मैदानावर उभारलेल्या इमारतींवर चढले होते.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेखावत यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला पहिल्या भागातल्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आता हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.