मुंबई - Swapnil Joshi : आजवर एखाद्या चित्रपटात नायकाचा संबंध एक, दोन किंवा फार तर तीन स्त्रियांशी दर्शवण्यात आला आहे, परंतु आगामी मराठी चित्रपट 'बाई गं'मध्ये स्वप्नील जोशी चक्क सहा बायकांच्या गराड्यात दिसणार आहे. थोडक्यात 'बाई गं' मध्ये स्वप्नील जोशीची अनोखी 'सिक्सर' बघायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी विविध वयोगटांतील सहा अभिनेत्रींसह चमकताना दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, आणि नेहा खान या त्या अभिनेत्री असून चित्रपटातील त्यांच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत. "बाई गं" या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे नाव "जंतर मंतर" असून ते नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
या चित्रपटाची कथा एका पुरुषाची आहे, जो सहा स्त्रियांशी प्रेमाचे नातं जुळवतो. स्वप्नील जोशी 'जंतर मंतर' या गाण्यात सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, आणि नेहा खान यांच्याबरोबर दिसतोय. विशेषत, 'मितवा' नंतर स्वप्नील आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. "जंतर मंतर" या गाण्याला अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर आणि संचिता मोरजकर यांनी आपला आवाज दिला आहे, आणि संगीत दिलंय वरुण लिखाते यांनी. गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. हे गाणं एवरेस्ट एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी लिहिले आहेत, तर संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन, आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स यांनी 'बाई गं' चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. चित्रपटाची संकल्पना आणि कलाकारांची निवड प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
'बाई गं' हा चित्रपट १२ जुलैला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.