नवी दिल्ली : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून दु:ख व्यक्त केलं जातंय. उद्योगजगतामधून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ते महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांसारख्या अनेक प्रमुख उद्योगपतींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
सुंदर पिचाई यांनी वाहिली श्रद्धांजली :रतन टाटा यांच्याशी झालेल्या त्यांच्या शेवटच्या संवादाची आठवण करून देत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, "टाटा समूहाच्या अध्यक्षांना भारताला अधिक चांगलं बनवण्याची इच्छा होती. गुगलच्या ऑफिसमध्ये रतन टाटा यांच्याशी माझी शेवटची भेट झाली. तेव्हा आम्ही Waymo च्या प्रगतीबद्दल बोललो. टाटा यांनी भारतातील आधुनिक व्यावसायिक नेतृत्वाला मार्गदर्शन आणि विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताला अधिक चांगलं बनवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो."
आनंद महिंद्रांनी व्यक्त केला शोक : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले की, "भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा आमच्या या पदावर असण्याशी खूप मोठा संबंध आहे. त्यामुळं या क्षणी त्यांचं मार्गदर्शन बहुमोल ठरलं असतं. त्यांच्या जाण्यामुळं आम्ही फक्त त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक समुदायाच्या सेवेसाठी सर्वात उपयुक्त असलेले उद्योजक होते. त्यांचं योगदान विसरलं जाणार नाही. गुडबाय आणि गॉडस्पीड मिस्टर टी. तुम्हाला विसरलं जाणार नाही. कारण महापुरुषांचा कधीही मृत्यू होत नाही."
टाटा सन्सच्या अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली : टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मभूषण एन. चंद्रशेखरन म्हणाले की, “आम्ही रतन टाटा यांना निरोप देतोय. ते खरोखरच असामान्य नेतृत्व होते. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळं केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचनादेखील घडली आहे. टाटा समूहासाठी रतन टाटा हे अध्यक्षांपेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी उदाहरणाद्वारे प्रेरणा दिली. उत्कृष्टता, एकात्मता आणि नवकल्पना यांच्या अतूट बांधिलकीसह टाटा समूहानं त्यांच्या नेतृत्त्वाखाली जागतिक छाप सोडली आहे. संपूर्ण टाटा परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील."