महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबापुरी, मायानगरी आता श्रीमंतांची नगरी! अब्जाधीशांच्या संख्येत बीजिंगला टाकलं मागे - Harun global rich list 2024 - HARUN GLOBAL RICH LIST 2024

देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहराला पुन्हा एकदा 'अब्जाधीशांचे शहर' म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत आशिया खंडात मुंबई बीजिंगला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थतज्ज्ञांनी हे स्वागतार्ह चित्र असून भारताच्या आर्थिक धोरणांमुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

Mumbai overtakes beijing to become asias billionaire capital
Mumbai overtakes beijing to become asias billionaire capital

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 11:58 AM IST

Updated : Mar 26, 2024, 5:09 PM IST

मुंबई- मुंबईला मायानगरी, मुंबापुरी तसंच देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाते. आता मुंबईला 'अब्जाधीशांची नगरी' म्हणावं लागेल, अशी माहिती समोर येत आहे. आशियातील अब्जाधीशांच्या संख्येत मुंबईनं चीनची राजधानी असलेल्या बीजिंगलादेखील मागे टाकलं आहे. आशिया खंडात सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत असल्याची आकडेवारी हुरुन रिसर्च प्लॅटफॉर्मच्या 2024 च्या अहवालात दिली आहे.

जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत आता भारतातील मुंबई तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीय. या यादीत न्यूयॉर्क 119 अब्जाधीशांसह पहिल्या स्थानावर आहे. लंडन 97 अब्जाधीशांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई शहर 92 अब्जाधीशांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं चीनच्या बीजिंग शहराला मागे टाकले आहे. बीजिंगमध्ये आता 91 अब्जाधीश आहेत. सात वर्षानंतर मुंबई अब्जाधीशांच्या यादीत आशिया खंडामध्ये अव्वल स्थानावर आली आहे.

किती अब्जाधीशांची झाली वाढ?हुरुन २०२४ प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मुंबईने एका वर्षात नवे 26 अब्जाधीश या यादीत जोडण्याचा मान पटकावला आहे. मात्र, बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश आहेत तर मुंबईत 92 अब्जाधीश आहेत. मुंबईतील सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती ही 445 अब्ज डॉलर इतकी आहे ही संपत्ती गतवर्षाच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढले असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या तुलनेत बीजिंगमधील अब्जाधीशांच्या संपत्तीचे प्रमाण 265 अब्ज डॉलर इतके आहे. बीजिंगच्या अब्जाधीशांचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाली आहे.

कोणत्या क्षेत्रांमुळे झाली वाढ?" मुंबईमध्ये उद्योगासाठी आणि व्यवसायांसाठी अतिशय योग्य संधी आणि साधन संपत्ती आहे. मुंबईतील उद्योग व्यवसायांची साधन संपत्ती वाढवण्यामध्ये ऊर्जा क्षेत्र आणि औषध निर्मिती क्षेत्राची मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या नफ्याचे वाढते प्रमाणही याला कारणीभूत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रकाश पाठक यांनी सांगितले. मुंबईतील अब्जाधीशांची वाढलेली संख्या योग्य वाटत असली तरी मुंबईवरील अधिक भार आता सहन करणे शक्य नाही. त्यामुळे ही वाढ एखाद्या नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण देऊ शकते," अशी भीतीही पाठक यांनी व्यक्त केली आहे.

आर्थिक धोरणांचा परिणाम - अर्थतज्ज्ञ वैद्य-अर्थतज्ज्ञ रवींद्र वैद्य यांचा दावा आहे की, "अब्जाधीशांच्या यादीत मुंबईनं मिळवलेला क्रमांक हा साहजिक आणि स्वागतार्ह आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं स्वीकारलेल्या आर्थिक धोरणाचा परिणाम दिसत आहे. भारतानं केलेल्या 'मेक इन इंडिया', निर्यात धोरणातील लवचिकता, लिक्विडेशन कायदामध्ये केलेली सुधारणा, इज ऑफ डूइंग बिजनेससाठी केलेली मदत आणि प्रोत्साहन तसेच भारतातल्या उद्योगपतींना जोखीम उचलण्याचा दिलेला विश्वास या सर्वामुळे हे शक्य झालं आहे. उद्योगांना अनुकूल अशी सरकारी धोरणे राबविण्यात आली. आर्थिक उदारीकरणात सरकार उद्योगांना मदत करत आहे. ते पाहता अर्थव्यवस्थेला मिळालेली गती हे या अब्जाधीशांच्या यादीतल्या स्थानाचे द्योतक आहे, असा दावा अर्थतज्ज्ञ वैद्य यांनी केला. अदानी उद्योग समूह हा ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. तेव्हा अशा उद्योजकांकडे काहीतरी गैर करत आहेत, असे न पाहता ते राष्ट्रनिर्मितीत हातभार लावत आहेत. रोजगार निर्मिती करत आहेत, या दृष्टीनं पाहिले तर निश्चितच उद्योगांची आणि देशाची भरभराट अशाच पद्धतीने होत राहील, " असे वैद्य यांचं मत आहे.

लोढा यांना अर्थव्यवस्थेतील तेजीचा फायदा-बांधकाम क्षेत्रातील लोढा समूहाला गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या फायद्याबद्दल विचारले असता वैद्य म्हणाले की, "मंगल प्रभात लोढा यांच्या संपत्तीमध्ये 116 टक्क्यांनी झालेली वाढ ही बांधकाम व्यवसायातील आलेल्या तेजीमुळे झाली आहे. मात्र जेव्हा आर्थिक मंदी असते, तेव्हा सर्वात आधी फटका याच व्यवसायाला बसतो. जो व्यक्ती मेहनत करून पैसे लावतो त्याला योग्य परतावा मिळणे गैर नाही," असेही वैद्य म्हणाले. "गेल्या काही वर्षात भारताचे ढोबळ उत्पन्न आणि दरडोईचे उत्पन्न सुद्धा वाढले आहे," दावा अर्थतज्ज्ञ वैद्य यांनी केला.

काय म्हटले आहे हुरुन 2024 अहवालात?

  • मुंबईचा देशाच्या विकासात आजवर सिंहाचा वाटा राहिला आहे. बीजिंगमध्ये नव्यानं 7 अब्जाधीश आले आहेत. तर मुंबईत 27 नवीन अब्जाधीश आले आहेत. मुंबईतील एकूण संपत्ती ही 47 टक्क्यांनी वाढताना बीजिंगमधील एकूण संपत्तीत 28 टक्क्यांनी घट झाली आहे.
  • भारतामध्ये नव्यानं 94 अब्जाधीशांची भर पडली आहे. त्या तुलनेत चीनमध्ये केवळ 55 नव्या अब्जाधीशांची संख्या भर पडली आहे. भारत हा अब्जाधीशांच्या संख्येत भर घालणारा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशात 271 अब्जाधीश आहेत.
  • जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत वार्षिक सरासरी 5 टक्क्यांनी वाढ होते. त्या तुलनेत भारतामधील अब्जाधीशांचे वाढणारे प्रमाण हे जर्मनीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा देश ठरत असल्याचं हुरुन अहवालात सूचित केलं आहे.
  • भारताचे अब्जाधीश हे दूरसंचार ऊर्जेसह कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेतदेखील आहेत. नवीन उद्योजक हे कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं संशोधन करून उद्योगात भरारी मारत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आणखी नवीन अब्जाधीश निर्माण करण्याची क्षमता भारतात असल्याच अहवालात नमूद केलं आहे.
  • हुरुन अहवालानुसार, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री तथा उद्योगपती मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक 116 टक्क्यांनी वाढली आहे.
  • जगभरातील श्रीमंताच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जगभरातील श्रीमंताच्या यादीत 10 वा क्रमांक आहे. त्यांची 115 अब्ज डॉलर संपत्ती आहे. तर गौतम अदानी हे जगभरातील श्रीमंताच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 86 अब्ज डॉलर आहे. तर एचसीएलचे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाचा यादीत 34 वा क्रमांक आहे. सिरम इनस्टिट्युटचे सीईओ सायरस पुनावाला यांची संपत्ती किंचित घसरली आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 82 अब्ज डॉलर इतकी आहे.

हेही वाचा-

  1. मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?
  2. अदानींची लाचारी सोडून मुंबईला वाचवा- खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिमंडळाच्या 'त्या' निर्णयावरून टीका
Last Updated : Mar 26, 2024, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details