नवी दिल्ली -एअर इंडिया एक्सप्रेसची ७० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. कारण, वरिष्ठ विमान कर्मचारी ही सामूहिकपणे आजारी असल्याचं कारण सांगून सुट्टीवर गेले आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यानं अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी नियोजित असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द झाली आहे. अनेक विमान कर्मचारी सुट्टीवर गेल्यानं विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका एअर इंडिया एक्सप्रेसला बसला आहे. याची नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं गांभीर्यानं नोंद घेतली आहे.
विमान कंपनीनं ही दिली प्रतिक्रिया-एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, " काही विमान कर्मचाऱ्यांनी शेवटच्या मिनिटाला आजारी असल्याची माहिती दिली. त्याचा परिणाम म्हणून विमान उड्डाणे उशिरा होणे आणि रद्द होण्याचे प्रकार घडले आहे. या घटनेमागं काय कारण आहे, हे समजावून घेण्यासाठी आम्ही विमान कर्मचाऱ्यांशी संपर्कात आहोत. आमची टीम समस्या दूर करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. त्यामुळे ग्राहकांची कमीत कमी गैरसोय होईल, असा विश्वास एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यानं व्यक्त केला. विमान उड्डाण रद्द झाल्यानंतर ग्राहकांना संपूर्ण पैसे अथा इतर विमान तिकिटाचे नियोजन करून देण्यात येईल.