अहिल्यानगर (शिर्डी) : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदी पात्रात गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या चार वर्षीय मुलाच्या हत्येचा उलगडा झालाय. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या मुलाची हत्या करून मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला याबाबतची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली.
नदी पात्रात चार वर्षीय मुलाचा मृतदेह : 20 डिसेंबर 2024 ला चासनळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात एका गाठोड्यात चार वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांना ओळख पटवणं आणि गुन्ह्याचा तपास करण्याचं मोठं आव्हान होतं. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत मुलाची ओळख पटवली. त्यानंतर तपास करत पोलिसांनी चिमुकल्याची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली.
अनैतिक संबंधामुळं मुलाची हत्या : "चिमुकल्याची आई ही पतीपासून वेगळी राहत होती. ती मुलासह स्वतंत्र जीवन जगत होती. दरम्यान, तिचं एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध जुळले. मात्र, चिमुकला त्यांच्या नात्यात अडसर ठरत असल्यानं दोघांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. चिमुकल्याच्या आईनं प्रियकराच्या मदतीनं मुलाला ठार मारून त्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून दुचाकीवरून गोदावरी नदीत फेकून दिला," अशी माहिती पोलिसांनी दिली.
वडिलांनी दिली माहिती : मृत चिमुकल्याच्या वडिलांना पत्नी आणि तिच्या प्रियकरावर संशय होता. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास करत आरोपींना शोधण्याचं काम सुरू ठेवलं. अखेर आरोपी महिलेला दिंडोरी येथून अटक करण्यात आली, तर तिच्या प्रियकराला नाशिक जिल्ह्यातील भऊर येथे सापळा रचून पकडण्यात आलं. कोपरगाव पोलीस अधिक तपास करत असून, या हत्याकांडानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा -
- कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
- शाळेच्या आवारात 6 वर्षाच्या चिमुकलीचा सापडला मृतदेह, मुख्याध्यापकाला अटक होताच धक्कादायक माहिती समोर - Gujarat School girl murder
- लैंगिक अत्याचार करून मुलीची हत्या; संशयित ताब्यात, खासदारांना कोसळलं रडू