अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 42 वर्षीय तांत्रिकाचा रविवारी (8 डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या तांत्रिकानं 12 जणांना केमिकलयुक्त पेय देऊन हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सरखेज पोलिसांनी नवलसिंह चावडा याला 3 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास अटक केली होती. यावेळी तो एका व्यावसायिकाविरुद्ध खुनाचा कट रचण्यासाठी जात होता. याप्रकरणी चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती खालावली. त्याला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
चौकशीदरम्यान हत्येची कबुली : पोलीस उपायुक्त (डीसीपी) शिवम वर्मा यांनी सांगितलं की, "चौकशीत आरोपीनं 12 खून केल्याची कबुली दिली आहे. ते सर्व मृत्यू सोडियम नायट्रेटच्या सेवनामुळं झाले आहेत. आरोपी पीडितांना पाण्यात मिसळून 'सोडियम नायट्रेट' प्यायला देत असे. आरोपीनं अहमदाबादमध्ये एका व्यक्तीची, सुरेंद्रनगरमध्ये त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांसह सहा जणांची, राजकोटमध्ये तीन, वांकानेर आणि अंजार (कच्छ जिल्हा) येथे प्रत्येकी एकाची हत्या केल्याची कबुली दिली." चावडा यानं सुमारे 14 वर्षांपूर्वी त्याच्या आजीची तसंच गेल्या वर्षी त्याच्या आई आणि काकांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं.
अशी करायचा हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावडानं सुरेंद्रनगर येथील प्रयोगशाळेतून ड्राय क्लीनिंगमध्ये वापरण्यात येणारे सोडियम नायट्रेट हे रसायन विकत घेतले होते. त्याला या रसायनाची माहिती दुसऱ्या तांत्रिकाकडून मिळाली होती. या पदार्थाचं सेवन केल्यानंतर 15 ते 20 मिनिटांत त्याचा परिणाम जाणवतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आरोपी स्वत:ला ‘भुवाजी’ म्हणवून घेत होता. सुरेंद्रनगरच्या वाधवन येथेही त्याचा आश्रम आहे. तिथे तो कथित काळी जादू करत असे, असं पोलिसांनी सांगितलं. संपत्तीत वाढ होण्यासाठी तो अनेकांना तोडगे सुचवायचा. पोलिसांनी चावडाच्या वाहनातून धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि पांढऱ्या पावडरसह अनेक आक्षेपार्ह पुरावे जप्त केले आहेत.
हेही वाचा -
- Aurangabad Crime: तांत्रिकाच्या नादी लागून आईचा मुलीला जाळण्याचा प्रयत्न, वाचा काय होते कारण...
- Black magician murder : 'पैशांचा पाऊस' पडेना, भक्तांनी केली मांत्रिकाचीच हत्या
- Godman arrested Pune : मुलाला बरे करण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून मातेवर बलात्काराचा प्रयत्न