नवी दिल्ली Shiv Jayanti 2024 :देशभरात आज शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवरायांचा उल्लेख 'रयतेचा राजा' असा करत, महाराजांनी धर्म-पंथांचा विचार न करता स्वराज्य निर्माण केलं, असं नमूद केलं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सुमारे 2 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मोदींनी शिवाजी महाराजांची महती सांगितली आहे. शिवाजी महाराज दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप होते. त्यांचं जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असं मोदींनी म्हटलंय.
राहुल गांधींनी अभिवादन केलं :महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर राहुल गांधी यांनीही ट्वीट करत महाराजांना अभिवादन केलं आहे. "शौर्याचं प्रतिक आणि पराक्रमाचं उदाहरण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात त्यांची निर्भयता आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील", असं राहुल गांधी म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांचं अभिवादन : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. आमचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे, मुघलांशी नाही, असं ते म्हणाले. अद्वितीय योद्धा, महान रणनीतीकार, प्रशासक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची शौर्यगाथा आम्हा सर्वांना राष्ट्रसेवेसाठी नेहमीच प्रेरणा देत राहील, असं आदित्यनाथ म्हणाले.
हे वाचलंत का :
- मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पडला पार; शिवनेरी गडावर शिवप्रेमींची गर्दी
- शिवनेरीवरीवरून मराठा आरक्षणाबाबत मोठं अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
- शिवजयंती तारखेनुसार का साजरी केली जाते? शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कधीपासून सुरू झाला शासकीय सोहळा? जाणून घ्या