महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचं कार्य - Savitribai Phule Death Anniversary

Savitribai Phule Death Anniversary : महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला करणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचं कार्य
देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचं कार्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 9:25 AM IST

Savitribai Phule Death Anniversary : कधीकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज शिक्षण घेतल्यानंतर सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. त्या राजकारणापासून व्यवसाय आणि संरक्षण सारख्या क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. महिलांना शिक्षणाकडे नेण्याचं आणि त्यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला करण्याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं. देशातील पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची आज 10 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या समाजसुधारक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. फुले यांनी 19व्या शतकात पुण्यात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला होता. त्यांचं योगदान तर्कसंगतता आणि सत्य, समानता आणि मानवता यासारख्या मानवी कारणांभोवती फिरते.

सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय : सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव इथं झाला. त्या काळात मागासवर्गीयांना भेदभावाची वागणूक मिळत होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. विशेषत: स्त्रियांना अजिबात अभ्यास करण्याची परवानगी नव्हती. पण सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्वत:च शिक्षणच घेतलं नाही, तर त्यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. एकदा सावित्रीबाई लहान असताना कुठूनतरी त्यांना एक इंग्रजी पुस्तक मिळालं. सावित्रीबाईंच्या हातातलं पुस्तक वडिलांनी पाहिल्यावर त्यांनी ते हिसकावून घेत फेकून दिलं. त्यांच्या वडिलांनी स्पष्ट केलं की केवळ उच्च जातीतील पुरुषांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मागासवर्गीय आणि विशेषत: महिलांना शिक्षण घेऊ दिलं जात नाही.

सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण : सावित्रीबाई फुले यांनी बालपणीच शिक्षण घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा जोतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. त्यांचं लग्न झालं तेव्हा सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या. त्यांचे पती ज्योतिराव फुले हे तिसरीत शिकत होते. सावित्रीबाईंनी पतीसमोर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ज्योतिराव फुले यांनी त्यांना परवानगी दिली. त्यांना शाळेत शिकण्यासाठी पाठवले. लग्नानंतर सावित्रीबाईंना शाळेत जाणं सोपं नव्हतं. त्यांना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यांच्यावर कचरा आणि चिखल फेकण्यात आला. पण त्यांनी हार मानली नाही. त्या नियमितपणं शाळेत जात राहिल्या.

पहिली मुलींची शाळा :सावित्रीबाई फुले यांनी स्वत: अभ्यास तर केला. त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अनेक मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा करुन देण्याची प्रेरणा दिली. मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये, असा विचार करुन सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुणे इथं देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांनी एकामागून एक मुलींसाठी 18 शाळा बांधल्या. शिक्षणाबाबत त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं सावित्रीबाई यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिका मानलं जातं. सावित्रीबाई या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही होत्या. सावित्रीबाई यांचं वयाच्या 66 व्या वर्षी 10 मार्च 1897 रोजी निधन झालं. मात्र, त्यांच्या कार्यामुळं त्या अजरामर झाल्या आहेत.

हेही वाचा :

  1. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी

ABOUT THE AUTHOR

...view details