लखनऊ Union Minister Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आजपासून सुरू होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज लखनौला पोहोचले. यावेळी त्यांनी बसपा नेत्यांना आपल्या पक्षात येण्याचं आवाहन केलं. मायावती जर आपल्यासोबत आल्या तर त्यांना आरपीआयचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल, अशी त्यांनी खुली ऑफर दिलीय.
मायावतींना अध्यक्ष करतो : यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंनी बसपाच्या नेत्यांना आरपीआयमध्ये येण्याचं आवाहन केलंय. बाबासाहेब आंबेडकरांची तत्त्वं पुढं न्यायची असतील तर बसपाच्या नेत्यांनी आरपीआयमध्ये सामील व्हावं, असंही त्यांनी सांगितलं. आरपीआय बसपाची जागा घेत आहे. बसपा प्रमुख मायावती यांना सोबत येण्याचं आवाहन आठवले यांनी केलंय. बसपा प्रमुख सोबत आल्यास त्यांना आरपीआयचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल, अशी थेट ऑफर त्यांनी मायावतींना दिलीय.
नितीश कुमारांच्या निर्णयाचं समर्थन :विरोधकांवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, "विरोधक मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचं सांगत आहेत. पण हे सर्व निराधार आहे. संविधानावर प्रश्न उपस्थित करणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे." तसंच 'इंडिया' आघाडीची युती आता तुटत असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी बिहारमधील नितीश कुमार यांच्या निर्णयाचं समर्थन केलंय. बंगालमध्ये ममतांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. सर्वत्र आघाड्या तुटत आहेत. भाजपानं यूपीमध्ये आयपीआयला सोबत घेतल्यास बसपातील नाराज नेते मोठ्या संख्येनं पक्षात येतील, असा दावाही त्यांनी केलाय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची घेणार भेट : आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्याचं आठवलेंनी सांगितलंय. रामदास आठवले हे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. यूपीमध्ये आरपीआय बसपाला पर्याय होणार असल्याचा त्यांनी दावा केला. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षानं महाराष्ट्रात दोन जागा मागितल्या आहेत. तसंच शिर्डी लोकसभेची जागाही मागितल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज दुपारी चार वाजता अधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
हेही वाचा :
- 'एनडीए'मध्ये प्रकाश आंबेडकर आले तर मी मंत्रिपद सोडेल - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
- लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रामदास आठवलेंची मोठी मागणी, आरपीआयसाठी मागितल्या 'इतक्या' जागा