नवी दिल्ली PM Narendra Modi Road Show in Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे. पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी ते 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं भाजपानं जोरदार तयारी सुरू केलीय. पंतप्रधान मोदींच्या नामांकन रॅलीत देशातील 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री, खासदार, आमदार सहभागी होणार आहेत. यासोबतच एनडीए आघाडीतील सर्व पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.
6 किमी लांबीचा रोड शो : उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी PM मोदी सोमवारी वाराणसीमध्ये मेगा रोड शो करणार आहेत. पंतप्रधानांचा 6 किलोमीटर लांबीचा रोड शो बनारस हिंदू विद्यापीठातून दुपारी 4 वाजता सुरू होऊन काशी विश्वनाथ मंदिरात सांगता होईल. यावेळी वाराणसीतील लोक त्यांचं स्वागत करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी सोनारपुरा, गोदौलिया, बन्सफाटक मार्गे लंका चौरस्त्यावरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचतील. मंगळवारी, 14 मे रोजी नामांकन भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा करतील. यानंतर ते कालभैरव मंदिरात जाऊन विशेष पूजा करणार आहेत.