महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज काशीतून किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता करणार जारी - PM Modi Varanasi visit - PM MODI VARANASI VISIT

PM Modi at Varanasi Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 जून) वाराणसी दौऱ्यावर असून 100 क्विंटल गुलाबांनी त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. तसंच आज किसान संवाद कार्यक्रमांतर्गत ते 21 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शिवाय दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीतही ते सहभागी होणार आहे.

PM Modi at Varanasi Today
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 1:24 PM IST

वाराणसी PM Modi at Varanasi Today : तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 जून) दुपारी 4 वाजता काशीत येत आहेत. वाराणसीत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करतील. यावेळी पंतप्रधान मोदी किसान संवाद कार्यक्रमांतर्गत 21 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून कृषी सखी म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रही देणार आहेत. काशी येथून डिजिटल किसान क्रेडिट कार्डही ते लॉन्च करणार आहेत. याशिवाय सेंद्रिय शेती करणाऱ्या 167 किसान सखींनाही आज प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे.


अनेक मार्ग वळवण्यात आले : पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. तसंच पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं वाहतूक पोलीस आयुक्तालय, वाराणसी यांनी सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार, वाराणसी रिंगरोड मार्गे बाहेरील जिल्ह्यातून जाणारी वाहनं हरहुआ चौरस्त्यापासून रखुनापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. रॅलीशी संबंधित वाहनंच यामार्गानं जातील. तर गाझीपूर, मऊ येथून प्रयागराजकडं जाणारी सर्व प्रकारची मोठी वाहनं हरहुवा चौक, बाबतपूर पोलीस चौकी, बडागाव, कापसेठी, कछूवा चौक मार्गे आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतील.


पोलीस लाईन ते दशाश्वमेध घाट या यात्रेच्या मार्गावर बनवलेल्या स्वागत स्थळांवर काशीच्या जनतेसह भाजपा कार्यकर्ते ढोल, शंख, डमरू वाजवून आणि फुलांचा वर्षाव करून पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत करतील. स्वागत आणि शुभेच्छांचे शेकडो छोटे-मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. दशाश्वमेध घाटावर गंगा मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान तेथून काशी विश्वनाथ मंदिराकडं रवाना होतील. येथेही त्यांच्या प्रवासात वाद्यांसह गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येईल.

बाबा विश्वनाथांचं औपचारिक दर्शन आणि पूजेनंतर पंतप्रधान बरेका गेस्ट हाऊसकडं रवाना होतील जिथे रात्रीच्या विश्रांतीनंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता विमानानं त्यांच्या गंतव्यस्थानाकडं रवाना होतील. पीएम मोदींसोबतच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी, राज्य संघटनेचे सरचिटणीस धरमपाल जी, उत्तर प्रदेश सरकारचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही शेतकरी परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळं गंगा नदीत नौका चालवण्यावर बंदी : या दौऱ्यासाठी गंगा सेवा निधीसह काशीवासीयांनीही विशेष तयारी केली आहे. गंगा सेवा निधीचे कोषाध्यक्ष आशिष तिवारी म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा गंगा मातेच्या महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी वैदिक परंपरेनं माँ गंगा पूजन करतील. तसंच दशाश्वमेध घाटाला 10 क्विंटल फुलांच्या माळांनी सजवण्यात येणार आहे. घाटाचा प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळून निघणार आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष स्मृतिचिन्हही देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंगळवारी सायंकाळी घाटावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गंगा नदीत नौका चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी 10,000 हून अधिक जवान तैनात करण्यात आले असून, त्यामध्ये जल, आकाश आणि जमिनीवरून पाळत ठेवली जाणार आहे."

हेही वाचा -

  1. नरेंद्र मोदी यांची तिसरी पंतप्रधान पदाची कारकीर्द खडतर; एनडीएतील घटक पक्षांना गृहित धरून चालणार नाही - Brand Modi Faces Turbulence
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला पदभार; पहिलीच सही केली 'या' फाईलवर, शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा - Narendra Modi Takes Charge As PM
  3. नरेंद्र मोदींनी घेतली सलग तिसऱ्यांदा शपथ; एनडीएतील नेत्यांनी व्यक्त केला विश्वगुरु होण्याचा विश्वास - PM Modi Oath Ceremony

ABOUT THE AUTHOR

...view details