मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (15 जानेवारी) मुंबई ( PM Modi Mumbai visit ) दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान हे महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनदेखील करणार आहेत.
भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार लोकापर्ण करण्यात येणाऱ्या तीन युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकेचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे देशाच्या सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचं भारतीय नौदलानं म्हटलं आहे.
जाणून घ्या, तीनही युद्धनौकांविषयी
- भारतीय नौदलाच्या माहितीनुसार आयएनएस निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिलं जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आलं आहे. ही युद्धनौका देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचं प्रतिनिधित्व करते.
- आयएनएस सुरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचं चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे.
- आयएनएस वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचं प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं दिली आहे.
देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच- आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम आहेत. युद्धनौकांमुळे शत्रूनं डागलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी करणार चर्चा- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील दौऱ्यात महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या लोकप्रतिनिधींना रिपोर्ट कार्ड कसे बनवायचे? महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासासाठी कशा सूचना द्यायच्या, याबद्दल संबंधित आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, "राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आणि पाच वर्षांसाठी त्यांचा रोडमॅप कसा राबवायचा, याबद्दल महायुतीचे आमदार माहिती तयार करणार आहेत. तसेच सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती, आमदारांशी संबंधित मतदारसंघातील कल्याणकारी आणि विकास योजनांच्या लाभार्थ्यांची सध्याची आर्थिकसह सामाजिक परिस्थितीची माहितीदेखील सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियमितपणे मतदारांशी कसा संवाद ठेवण्यात येतो? संवादासाठी कोणत्या पद्धतीनं धोरण आखण्यात येते? याची माहितीदेखील तिन्ही पक्षांच्या आमदारांना द्यावी लागणार आहे".
- महायुतीच्या आमदारांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे.
हेही वाचा-