मुंबई- राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) पुढील 5 वर्षांत 25 हजार स्वमालकीच्या बस खरेदी करण्यास अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये दरवर्षी 5 हजार स्वमालकीच्या बस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर परिवहन विभागाने सादर करावा, अशी सूचना अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलीय.
10 हजार बस 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या : सध्या एसटी महामंडळाकडे 14 हजार 300 बस आहेत. त्यातील 10 हजार बस 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्या पुढील 3-4 वर्षांत सेवेतून बाद होतील. त्यामुळे एसटीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील 5 वर्षांत 25 हजार बस खरेदी करण्याची गरज आहे. त्यामुळे या मागणीला अर्थमंत्र्यांनी मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची गरज लक्षात घेऊन अजित पवारांनी तातडीने हा प्रस्ताव तत्वतः मान्य केला आहे, त्यामुळे परिवहन मंत्री सरनाईक यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानलेत.
एसटीच्या ताफ्यात 30 हजार गाड्या : या प्रस्तावाप्रमाणे 2029 पर्यंत 25 हजार बस आणि 5 हजार इलेक्ट्रिक बस अशा प्रकारे एसटीच्या ताफ्यात 30 हजार गाड्या येतील, त्यामुळे गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी याप्रमाणे आपण कार्यवाही करू शकतो, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी परिवहन विभागाची आढावा बैठक बोलावली होती, त्यामध्ये एसटीची सद्यस्थिती सांगताना परिवहन मंत्र्यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. आनंद दिघेंच्या जयंतीदिनी अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन राज्यातील जनतेला गोड भेट दिल्याने आपण त्यांचे आभारी असल्याचे मत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केलंय.
हे वाचलंत का :