मुंबई - 14 जानेवारी रोजी देशात, दक्षिणकडे पोंगल साजरा केला जात असून उत्तर भारतात मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज सर्वांसाठी खास दिवस आहे. 'द राजा साब'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील प्रभासचा एक नवीन पोस्टर रिलीज करून चाहत्यांना पोंगल तसेच मकर संक्रांतीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी पोंगलच्या शुभ मुहूर्तावर, प्रभासनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'द राजा साब' चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांना शुभेच्छा... लवकरच भेटू 'द राजा साब'बरोबर.' आता पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन प्रभासला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
'द राजा साब' चित्रपटातील पोस्टर रिलीज : 'द राजा साब'चे दिग्दर्शक मारुती यांनीही प्रभासचे पोस्टर शेअर करत देशवासीयांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शेवटची संक्रांत, जिथे हे सर्व सुरू झालं. ही संक्रांती, तुम्हाला 2025मध्ये प्रियेचे सर्वोत्तम रूप देण्याचे वचन देते. संक्रांतीच्या शुभेच्छा.' पोस्टरमध्ये प्रभास हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून दिसत आहे. यावर त्यानं तपकिरी चष्मा घातला असून त्याच्या चेहऱ्यावर मोठे हास्य असल्याचे दिसत आहे.
प्रभासच्या पोस्टरवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया : प्रभासच्या नवीन लूकवर एका चाहत्यानं लिहिलं, 'हा लूक खूपच छान आहे.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'मला वाटतं बाहुबलीनंतर प्रभासचा हा सर्वोत्तम लूक आहे.' अनेक चाहत्यांनी मारुती आणि त्याच्या टीमला पोंगल आणि संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या 'द राजा साब'च्या नवीन प्रदर्शन तारखेची अनेक चाहते वाट पाहत आहेत. 'द राजा साब'ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता याची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे. 'द राजा साब'च्या नवीन प्रदर्शन तारखेबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
'द राजा साब'बद्दल : मारुती दिग्दर्शित 'द राजा साब' हा एक रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'द राजा साब' चित्रपटात प्रभास दुहेरी भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात मालविका मोहनन आणि निधी अग्रवाल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा :