भुज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळ सीमा सुरक्षा दल (BSF), लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
एकता नगरहून कच्छमधील कोटेश्वर येथे उतरल्यानंतर मोदी सर क्रीक भागातील लक्की नाल्याजवळ पोहोचले, असं बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितलं. "त्यांनी जवानांना स्वतः हातानं मिठाई भरवून दिवाळी साजरी केली," असं अधिकारी पुढे म्हणाले.
अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बीएसएफचा गणवेश परिधान केलेले मोदी, गस्ती जहाजावरील जवानांना मिठाई देताना दिसत आहेत. ((एएनआय/डीडी न्यूज)) सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा देश सशस्त्र दलातील जवानांना पाहतो तेव्हा सुरक्षेची हमी मिळते. "मला अभिमान आहे की आमच्या जवानांनी प्रत्येक कठीण काळात स्वतःला सिद्ध केलं आहे. मी कच्छमध्ये उभा आहे, त्यामुळे मला भारतीय नौदलाचा उल्लेख करायला हवा," असंही ते म्हणाले.
”आज भारत स्वतःची पाणबुडी तयार करत आहे. आज आपलं तेजस लढाऊ विमान हवाई दलाचं बलस्थान बनत आहे. पूर्वी भारत हा शस्त्र आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा. आज भारत जगातील अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण क्षेत्राच्या वाढीबद्दल बोलताना सांगितलं.
"एकविसाव्या शतकातील गरजा लक्षात घेऊन, आज आम्ही आमच्या सैन्याला, आमच्या सुरक्षा दलांना आधुनिक साधनांनी सुसज्ज करत आहोत. आम्ही आमच्या लष्कराला जगातील सर्वात आधुनिक लष्करी दलांच्या गटात समाविष्ट करत आहोत. संरक्षण क्षेत्रात आमची आत्मनिर्भरता आहे,” असं पंतप्रधान पुढे म्हणाले.
आदल्या दिवशी, पंतप्रधानांनी एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाणारा भारताचा पहिला गृहमंत्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केला.
पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिव्यांचा सण-दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी लेह आणि लडाखमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दीपावली उत्सव साजरा केला होता आणि सैनिकांना संबोधित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी नेहमीच जवानांचं मनोबल उंचावण्यासाठी अनेकदा सैनिकांच्या सोबत त्यांच्या बिकट परिस्थितीतील ठाण्यावर जाऊन त्यांच्याशी बातचित केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान दिवाळीसारख्या सणाला जवानांच्यासोबत साजरा करण्याची मनोकामना पूर्ण करतात.
हेही वाचा..
- नरक चतुर्दशीला अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित; 250 वर्षांपासूनची प्रथा आजही कायम
- दिवाळी होणार गोड; महागाईच्या काळात मिळणार स्वस्तात लाडू, चिवडा