चंदीगड- गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं तुरुंगात असूनही गुन्हेगारी साम्राज्यातून दहशत कायम ठेवलीय. त्यानं थेट तुरुंगातून थेट व्हिडिओ जारी केले होते. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना नियमांचे उल्लंघन केल्यानं पंजाब पोलिसांनी डीएसपी गुरशे संधू यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केलं आहे.
पंजाब लोकसेवा आयोगानं (PPSC) मंजुरी दिल्यानंतर गृहविभागाचे सचिव गुरकिरत किरपाल सिंग यांनी पोलीस अधिकारी संधू यांच्या बडतर्फीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 चा नियम नमूद केला. या नियमानुसार औपचारिक चौकशीशिवाय अधिकाऱ्याला बडतर्फ, काढून टाकणे किंवा पदावनत करण्याचा सक्षम अधिकाऱ्याला अधिकार आहे.
अधिकाऱ्यावर काय ठेवलाय ठपका?निलंबनाच्या कारवाईनंतर पंजाब सशस्त्र पोलिस (पीएपी), अमृतसरच्या 9व्या बटालियनच्या कमांडंटकडे आरोपपत्र पाठवण्यात आलं होतं. बिश्नोईच्या मुलाखतीच्या रेकॉर्डिंगची सोय केल्याचा संधू यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. बिश्नोईच्या मुलाखतीदरम्यान संधू यांनी केलेले गैरवर्तन, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा खराब झाली आहे, असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
पंजाब सरकारनं आदेशात काय म्हटलं?बडतर्फीच्या आदेशात म्हटले आहे की, "अधिकाऱ्याच्या असहकार्य वृत्तीमुळे गुरशेर सिंग संधू, पीपीएस (निलंबनाखाली) यांना जारी केलेल्या आरोपपत्राची चौकशी करणं व्यवहार्य नाही. तथ्ये आणि परिस्थितीचा बारकाईने विचार केल्यावर, गुरशेर सिंग संधूनं आपल्या कृतीतून पंजाब पोलिसांच्या प्रतिमेला खराब केले. त्यांनी कर्तव्यात केलेली कसूर ही पंजाब पोलिसांच्या शिस्तीचं आणि वर्तनाचं घोर उल्लंघन आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये, गुरशेर सिंग संधू, पीपीएस (निलंबन अंतर्गत), पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे,” असे आदेशात म्हटलं आहे.
- संधू यांच्यावर 25 ऑक्टोबर 2024 पासून निलंबनाची कारवाई लागू झालेली आहे. त्यांच्यासह अन्य सहा पोलीस अधिकाऱ्यांची पंजाब दक्षता विभागाकडून बेहिशोबी मालमत्ता आणि वादग्रस्त आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी सुरू आहे.
उच्च न्यायालयानं पंजाब सरकारवर ओढले होते ताशेरे- पंजाबमध्ये पोलिस कोठडीत असताना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीबाबत 3 डिसेंबरला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं या मुद्द्यावरून पंजाब सरकारवर ताशेरे ओढले होते. कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असताना उच्च पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही, असा पंजाब सरकारला सवाल विचारला होता.
लॉरेन्सच्या मुलाखतीमुळे त्याची वाढली होती दहशत- लॉरेन्स बिश्नोई हा तुरुंगात असताना त्याच्या दोन मुलाखती व्हायरल झाल्या होत्या. 14 मार्च 2023 रोजी प्रसारित झालेली पहिली मुलाखत सीआयए खरार येथे घेण्यात आली होती. या मुलाखतीत बिश्नोईनं प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची कबुली दिली. राजस्थान पोलीस तपास करत असलेली दुसरी मुलाखत जयपूर मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आली होती.
लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये 650 हून अधिक शूटर- एनआयएच्या अहवालात लॉरेन्स बिश्नोई टोळीत 650 हून अधिक शूटर असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनआयएनं लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह 16 गुंडांवर UAPA अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं तरुणांना कॅनडा आणि अन्य देशात जाण्याचं आमिष दाखवून टोळीत सहभागी करून घेतलं आहे. सध्या बिश्नोई टोळी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आदी राज्यांमध्ये पसरली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात पोलिसांनी बिश्नोई टोळीतील गुंडांना अटक करून कारवाई केली आहे.
हेही वाचा-