नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी राज्यसभेत सभापती विरोधी पक्षनेत्यांनाही बोलू देत नाहीत, असा गंभीर आरोप केला. राज्यसभेचे सभापती पक्षपाती धोरण अवलंबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर खासदार मनीष तिवारी यांनीही सरकारवर मोठा हल्लाबोल केला. आम्ही सदन चालवण्याचा प्रयत्न करतो, मात्र सत्ताधारी चिथावणी देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 चांगलंच गदारोळात पार पडत असल्याचं स्पष्ट होत आहे.
काही खासदारांनाच मिळते बोलण्याची संधी :संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 सुरू झाल्यापासून मोठा वाद उभा राहिला आहे. लोकसभा आणि राज्यसभाही खासदारांच्या गदारोळांमुळे वारंवार तहकूब करावी लागत आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी सत्ताधारी खासदारांवर आरोप केला. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना दररोज सभागृहात बोलण्याची संधी मिळते. प्रत्येक वेळी ते सभागृहात बोलतात, तेव्हा ते अतिशय वादग्रस्त विधानं करतात. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यास मोकळीक दिली जाते. अनियंत्रित सरकारचा हेतू सभागृह चालवण्याचा नसून विरोधकांना चिथावणी देण्याचा आहे, असा गंभीर त्यांनी केला.