बीड- मस्साजोग येथील ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे समर्थक मनोज जरांगेंकडून धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरून उतरण्याची विनंती करण्यात आली. मात्र, धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम राहीले. टाकीवरून खाली उतरा, अशी मनोज जरांगे यांनी त्यांना हात जोडून विनंती केली. धनंजय यांना काही बरे वाईट झाले तर 'यांना' जगणे मुश्किल करेन, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.
- धनंजय देशमुख यांनी दोन तासांनतर आंदोलन मागे घेतलं आहे. पोलीस अधीक्षक आणि मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर ते टाकीवरून खाली उतरले आहेत.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुरुवातीला अर्धा ते पाऊण तासापासून गावात नसल्यानं गावकरी आणि महिला आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. टाकीवर चढून आंदोलन करताना धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ झाली. पाण्याच्या टाकीला जाणारी शिडी काढून टाकल्यानं पोलिसांना टाकीवर जाणं अवघड झालं आहे. गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहे. आरोपी आम्हाला मारण्याच्या आधी आम्ही जीव देतो, अशी धनंजय देशमुख यांनी भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे. एसआयटी, सीआयडी आणि सरकारचे प्रतिनिधी बोलून त्यांच्याशी चर्चा करू, असे पोलीस अधीक्षक कॉवत यांनी देशमुख यांना आश्वासन दिलं.
मस्साजोगमध्ये मोठा गोंधळ- गेली काही दिवस धनंजय देशमुख हे वाल्मिक कराड याच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्या मागणीवर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी टॉवर चढून आंदोलन करण्याचा रविवारी इशारा दिला होता. तसेच टॉवरवरून उडी मारण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टॉवरभोवती पोलीस बंदोबस्त होता. धनंजय देशमुख यांनी अचानक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. त्यामुळे मस्साजोग गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांसह ग्रामस्थ आणि मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांची मनधरणी करत आहेत. दुसऱ्या टाकीवर चढून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फोनवरून संवाद साधत पाण्याच्या टाकीवरून उतरण्याचं आवाहन केलं. मात्र, तपास समाधानकारक होत नसल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. प्रशासनाबाबत यावेळी ग्रामस्थांमध्ये संताप दिसून आला.
हेही वाचा-