नवी दिल्ली-आदिवासी समुदायातील भाजपाच्या खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून खासदार सोनिया गांधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींबद्दल वापरलेले शब्द त्यांच्या 'उच्चभ्रू' आणि 'आदिवासीविरोधी' मानसिकतेचं प्रतिक असल्याची टीका भाजपाच्या आदिवासी खासदारांनी केली.
Live updates
- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावानं कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप करत विरोधकांनी ३ फेब्रुवारी रोजी घोषणाबाजी करत गदारोळ केला. आभार प्रस्तावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात बोलण्याची शक्यता आहे.
- शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले," मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडं सर्व आकडेवारी मागितली आहे. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ते घटनेबाबत नॅरेटिव्ह करत असल्याचं म्हणतात. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा काय नियम होता? पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत होते. मात्र, त्यांनी सरन्यायाधीशांना काढले. त्यांच्याजागी पंतप्रधान हे मंत्री नियुक्ती करतात." दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात ७० लाख मतदारांची संख्या अचानक वाढल्याचा आरोप केला होता.
संसदीय नीतिमत्ता आणि आचारसंहितेसाठी सोनिया गांधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी भाजपाच्या खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींकडं मागणी केली. आदिवासी आणि गरीबांचा संघर्ष अद्याप त्यांना समजला नाही, अशी टीका खासदारांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.