हैदराबाद NEET UG Exam:'नीट' परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. नीट परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचे दर्शविणारे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे 'नीट'ची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही, असं सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. या सुनावणी दरम्यान न्यायालयातच हायव्होल्टेज ड्रामा झाला.
नेमकं काय घडलं? :याचिकाकर्त्याचे वकील नरेंद्र हुड्डा खंडपीठाला संबोधित करत असताना वकील मॅथ्यू नेदुमपारा हे मुद्दा सांगण्यासाठी उठले. दरम्यान सरन्यायधीश चंद्रचूड यांनी म्हटलं, " हुड्डा यांचं बोलणं झाल्यावर तुम्ही बोला." परंतु मॅथ्यूज नेदुमपरा यांनी ऐकलं नाही. "मी कोर्टाचा इन्जार्ज आहे. तुम्ही माझं ऐका आणि शांत बसा. अन्यथा तुम्हाला सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढण्यात येईल," अशा शब्दांत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ताकीद दिली. तरीसुद्धा मॅथ्यूज नेदुमपरा थांबले नाहीत. उलट ते म्हणाले, "मी सर्व वकिलांपैकी सर्वात ज्येष्ठ आहे. तुम्ही माझा आदर करा. अन्यथा मी येथून निघून जाईन." यावर सरन्यायाधीश चांगलेच संतापले. त्यामुळे आणखी वाद वाढला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बोलण्यावर ते म्हणाले, "मी स्वतः जातोय, हे त्यांना सांगण्याची गरज नाही." यावर सरन्यायाधीश म्हणाले की, "तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही." याचिकेच्या सुनावणीनंतर मॅथ्यूज नेदुमपरा यांनी सरन्यायाधीशांची माफी मागितली. ते म्हणाले "माझी चूक झाली. मला माफ करा".
- सर्वोच्च न्यायालयात मॅथ्यूज यांच्या वर्तणुकीवर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. न्यायालयात असं करण्याची वकील मॅथ्यूज नेदुम्पार यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी वाद घातला आहे. इलेक्ट्रोरल बॉड्स प्रकरणाच्या याचिकेदरम्यानदेखील त्यांनी असं केलं होतं. त्यावेळीदेखील सरन्यायाधीशांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले होते.