नवी दिल्ली-2024 वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. वर्षभरात नीट परीक्षेचा वाद असो किंवा वक्फ बोर्डाचा वाद असे बरेच प्रकार समोर आलेत. त्यातून देशातील राजकारणात बराच गदारोळही झालाय. आता त्याच प्रकरणांतील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात घडलेल्या घटनांचा आपण वेध घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ यात वर्षभरात नेमकं काय काय घडलंय.
...अन् नीटचा पेपर फुटला :राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेतील अर्जदारांच्या संख्येच्या बाबतीत अनेक अनियमितता होत्या, ज्यामुळे 2024 NEET-UG यांच्यात विवाद झाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) NEET-UG चे व्यवस्थापन करते, ही अंडरग्रॅज्युएट मेडिकल प्रोग्राम्समधील प्रवेशासाठीची राष्ट्रीय परीक्षा असते. 5 मे 2024 रोजी नीटच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु NTA ने परीक्षेचे प्रश्न लीक झाल्याच्या दाव्याचं खंडन केलं होतं. या प्रकरणात बिहारमधील पाटणा येथून पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं होतं, त्यात चार विद्यार्थ्यांचा समावेश होता, कारण त्यांनी आधी प्रश्न मिळवण्यासाठी 30 लाख ते 50 लाख रुपये दिले होते. गुजरातमधील गोध्रा येथून या घोटाळ्यासंबंधित प्रकरण उघडकीस आलं होतं. गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 10 लाख रुपयांची लाच घेऊन 27 उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत(NEET-UG) उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 9 मे रोजी यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानुसार गोध्रा येथील एका शाळेत NEET-UG साठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागा(सीबीआय)कडे सुपूर्द करण्यात आले होते. 4 जून 2024 रोजी जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याने आणखी वाद चिघळला. असंख्य विद्यार्थ्यांनी असे गुण मिळवले, जे गणिताच्या दृष्टीने अशक्य होते, त्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेत तक्रारी आणि कायदेशीर आव्हाने निर्माण केली. पुनर्परीक्षा घेण्याची आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी विरोध केलाय.
रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ :2024 मध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढल्याने रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्री अश्लील व्हिडीओ करून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रातील अशा तंत्रज्ञानाचे व्यक्तिगत आयुष्यातील सुरक्षा,गोपनीयता अन् नैतिक परिणामासंबंधी व्यापक चिंता निर्माण झाल्या होत्या.
तिरुपती लाडू प्रसादाचा वाद :आंध्र प्रदेशातील श्रीव्यंकटेश्वर स्वामी मंदिरात (तिरुपती मंदिर) प्रसादम (लाडू)मध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तूप भेसळीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन केली.विशेष तपास पथका(SIT)च्या अधिकाऱ्यांनी तिरुमला येथील पिठाच्या गिरणीची तपासणी केली. या ठिकाणी तूप साठवले जाते. हे तूप लाडू प्रसादात वापरले जाते.एसआयटी प्रमुख सर्वेश त्रिपाठी आणि त्यांच्या पथकाने तुपाचे टँकर आणि तिरुमला येथील तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) लॅबचीही तपासणी केली होती.तिरुपती मंदिरात नंदिनी तुपापासून लाडू बनवले जातात, जीपीएसद्वारे तूप पुरवठादारावर नजर ठेवली जाते. तसेच तिरुपती मंदिरात आता नंदिनी तुपाचा वापर लाडू बनवण्यासाठी केला जातो. नंदिनी हा कर्नाटक दूध महासंघाचा लोकप्रिय ब्रँड असल्याचंही तेव्हा समोर आलं होतं.
विनेश फोगाटचा पॅरिस ऑलिम्पिकवर बहिष्कार :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइलमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्याच्या काही तास आधी नियमानुसार तिचे वजन मोजण्यात आले, तेव्हा ते निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम अधिक होते. त्यामुळे विनेश फोगटला यासाठी अपात्र ठरवण्यात आले.त्यावेळी असंख्य खेळाडूंनी प्रतिसाद देत फोगटला पाठिंबा दर्शवला आहे आणि कुस्तीचे नियम बदलण्याची मागणी केलीय. विनेशने या प्रकरणी क्रीडा लवादाच्या न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र कोर्टातील निर्णयही विनेश फोगाटच्या विरोधात गेला. अशा प्रकारे विनेशचे सुवर्णपदक तर हुकलेच, पण तिला रौप्य पदकही मिळवता आले नाही. निराश होऊन विनेशने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील तिच्या दुःखद प्रवासाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांना जबाबदार धरले होते, कारण त्यांनी तिला पुरेसा पाठिंबा न दिल्याचा आरोप केला होता.
संदेशखळी प्रकरण वाद चिघळला :5 जानेवारी 2024 रोजी कथित रेशन वितरण घोटाळ्यात तृणमूल नेते शेख शाहजहान यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी संदेशखळी येथील सरबेडिया येथे पोहोचले होते. त्यावेळी नेता शेख शहाजहान फरार झाला होता. या काळात ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्लेही करण्यात आले होते. यानंतर लोकांनी आवाज उठवला अन् उघडपणे पुढे आले. गावातील लोक शेख शहाजहान आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेची मागणी करीत होते, मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने करीत होते. या निदर्शनांमध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. 8 फेब्रुवारीला आंदोलकांनी शेख शहाजहान यांच्या एका माणसाच्या मालकीच्या तीन पोल्ट्री फार्मला आग लावली, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
अदानींवर अमेरिकन सरकारचा गंभीर आरोप:जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानींच्या कंपनीवर वीज प्रकल्पांसाठी लाच दिल्याचा आरोप आहे. एका मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाशी जोडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी केला होता. गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांनी सरकारी अधिकाऱ्यांना 2,029 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 2019 ते 2020 मधलं आहे. अमेरिकन तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.