महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यूपीच्या अभियंत्यानं दृष्टी दिव्यांगांसाठी बनवला खास AI चष्मा; काय आहे वैशिष्ट्य? - MUNIR KHAN SUCCESS STORY

उत्तर प्रदेशातील रहिवासी मुनीर खान यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं दृष्टी दिव्यांगांसाठी खास चष्मा तयार केलाय.

Munir Khan Success Story Made Special Glasses for Blind Got First Job in Google UP Lakhimpur Kheri
यूपीच्या अभियंत्यानं दृष्टी दिव्यांगांसाठी बनवला खास AI चष्मा (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 11:44 AM IST

लखनौ/लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील गौरिया या छोट्याशा गावचे रहिवासी असलेल्या मुनीर खान यांनी दृष्टी दिव्यांगांसाठी खास AI चष्मा तयार केलाय. त्यांच्या या चष्म्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. जे लोक पाहू शकत नाहीत किंवा ज्यांची दृष्टी खूपच कमकुवत आहे, त्यांना हे चष्मे 50 मीटरच्या त्रिज्येत घडणाऱ्या गोष्टींचं विश्लेषण करून सतत माहिती देतात.

अमेरिकेत चष्म्याची चाचणी यशस्वी : मुनीर खान यांच्या या खास चष्म्याची नुकतीच अमेरिकेत ट्रायल रन झाली. हे अद्वितीय उपकरण अद्याप पहिल्या टप्प्यात असून अमेरिकेतील 800 लोकांवर केलेल्या चाचणीचा निकाल 87 टक्के यशस्वी झालाय. पुढं, त्याची चाचणी भारतातही केली जाईल आणि मशीन लर्निंग प्रक्रियेच्या मदतीनं ते भारतीय परिस्थितीनुसार तयार केले जाईल.

लखीमपूर खेरी येथील मुनीर खान यांनी दृष्टी दिव्यांगांसाठी खास चष्मा बनवला (ETV Bharat)

खास चष्म्याची किंमतही असेल खास : मुनीर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलत असताना सांगितलं की, ते या चष्म्याची किंमत अतिशय स्वस्त ठेवणार आहेत. जेणेकरून ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची किंमत निश्चित केली जाईल. अंदाजे भारतात या चष्म्याची किंमत 8000 ते 15000 रुपये असेल. 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी IIT बॉम्बेच्या टेकफेस्टमध्ये प्रथमच हा चष्मा प्रदर्शित केला जाईल. यावेळी हे उपकरण पाहण्यासाठी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा देखील तेथे उपस्थित राहणार आहेत. मुनीर खान सध्या अमेरिकेत असून त्यांची टीम या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून सेन्सर प्रणालीवर संशोधन करणाऱ्या मुनीरच्या या उपकरणाला अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यताही मिळाली असून भारतात पेटंटही दाखल करण्यात आलंय.

मुनीर यांना मिळाला यंग सायंटिस्ट अवॉर्ड : मुनीर खान यांनी सांगितलं की, 2013 मध्ये त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून 'यंग सायंटिस्ट अवॉर्ड' मिळाला होता. त्यानंतर जुलै 2024 मध्येही त्यांना हा पुरस्कार मिळाला.

कोण आहे मुनीर खान? : मुनीर खान एक तरुण वैज्ञानिक आहेत. गौरीया गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते शहरात गेले. मध्यंतरीच्या शिक्षणानंतर त्यांनी उत्तराखंडमधील भीमताल येथील महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना फ्रान्स आणि रशियामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये त्यांनी जगप्रसिद्ध कंपनी गुगलमध्ये पहिली नोकरी केली. सध्या, मुनीर हे कॅडर टेक्नॉलॉजी या संशोधन कंपनीचे संस्थापक आहेत.

हेही वाचा -

  1. अंध असूनही बनले हरहुन्नरी कलाकार; रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी - Nandkishor Ghule Success Story
  2. एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम, इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Rahul Petare can clap by one hand
  3. नेत्रदान चळवळीतून साकारला राज्यातील पहिला 'अंध बांधवांचा बचत गट'; चळवळीला अनेकांचा हातभार

ABOUT THE AUTHOR

...view details