लखनऊ Court Punished Jugnu Walia : कुख्यात मुख्तार अन्सारी टोळीतील गुंड जुगनू वालिया हा पंजाबच्या पटियाला कारागृहात बंद आहे. मात्र मार्च 2011 मध्ये खंडणी न दिल्यानं संतापलेल्या जुगनू वालिया यानं व्यापाऱ्यावर गोळीबार केला. या प्रकरणी त्याला न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च 2011 मध्ये आलमबागमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयानं जुगनू वालियाला ही शिक्षा सुनावली आहे. उत्तरप्रदेशातील टॉप 65 गुन्हेगारांच्या यादीत जुगनू वालियाचा समावेश आहे. पंजाबच्या तुरुंगात बंद असूनही त्याला परत आणण्यात उत्तरप्रदेशच्या पोलिसांना यश आलेलं नाही.
डबल बॅरल बंदुकीनं केला गोळीबार :तक्रारदार अधिकारी अरविंद कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र सिंग दीपा यांनी लखनऊमधील आलमबाग पोलीस ठाण्यात 9 मार्च 2011 ला तक्रार दाखल केली. देवेंद्र सिंग दीपा हे रात्री 9.30 वाजता घराच्या दरवाजाजवळ उभं राहून शेजाऱ्याशी बोलत होते. त्याचवेळी जुगनू वालिया हा त्यांच्या घरासमोर स्कूटरवर येऊन थांबला. यावेळी त्यानं त्याच्या हातातील डबल बॅरल बंदुकीनं त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांनी घरात धावत जाऊन आपला जीव वाचवला. मात्र, या गोळीबारात त्यांच्या कारचं नुकसान झालं. या प्रकरणी विशेष न्यायालयानं जुगनू वालियाला दोन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. खंडणीची मागणी केलेली रक्कम न दिल्यामुळे जुगनू वालिया यानं तोडफोड केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.