नवी दिल्ली Massive Fire Breaks Out In Delhi : इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना दिल्लीतील गीता कॉलनी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या शास्त्री नगर इथल्या इमारतीत पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलानं इमारतीतून नऊ जणांना बाहेर काढलं आहे. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र यातील दोन मुलींसह चार जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे.
इमारतीच्या तळघरात लागली आग :इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांना मृत्यू झाल्यानं नागरिकांना चांगलाच हादरा बसला. याबाबत बोलताना दिल्लीतील शाहदरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र चौधरी म्हणाले की, "इमारतीमध्ये पहाटे 5.22 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर इथल्या गल्ली क्रमांक 13 मधील एका घरात आग लागली होती. आगीची माहिती मिळताच पोलीत पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. चार मजली इमारतीच्या तळघरात ही आग लागली आहे. मात्र धुराच्या लोटानं सगळी इमारत वेढल्यानं आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. तळघरातील वाहनांना आग लागून ही आग इमारतीत पसरली."