नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकार अन् निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय.
निवडणूक आयोग सरकारचे गुलाम- राऊत : संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी देशासमोर महत्त्वाचे प्रश्न ठेवले आहेत. या देशातील निवडणूक आयोग जिवंत असेल, त्यांचा आत्मा मेलेला नसेल तर त्यांनी राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत. परंतु निवडणूक आयोग याची उत्तरं देणार नाहीत. कारण निवडणूक आयोग सध्या राज्यात तयार केलेल्या सरकारची गुलामी करीत आहे. आम्ही दिल्ली अन् महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडे जाऊन वारंवार सांगितलंय. परंतु तो मेलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 39 लाख मतदार कुठून आलेत आणि कुठे जाणार आहेत. आता हे 39 लाख मतं बिहारमध्ये जातील, असंही संजय राऊत म्हणालेत.
39 लाख मतं बिहारमध्ये जाणार- राऊत : आता ती फ्लोटिंग मतं आहेत. तीच नावं राहणार, तेच आधार कार्ड राहणार, सर्व काही सारखंच राहणार आहे, ते मतदार फिरत राहतात. थोडे दिल्लीत आलेत. आता हे 39 लाख मतं बिहारमध्ये जाणार आणि मग तिकडून ती मतं उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. इथे हा नवा पॅटर्न सुरू झालाय. याच पॅटर्ननं भाजपावाले निवडणूक लढतात आणि जिंकतात. त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही जे प्रश्न विचारलेत ते देशासाठी खूप गंभीर आहेत. निवडणूक आयोगानं कफन हटवून राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असं आवाहनही संजय राऊतांनी केलंय.
मतदान बॅलेटवर घ्या- सुळे : विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आलेत. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात उत्तम जानकर आमच्या पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेत. उत्तम जानकर सोलापुरातून निवडून आहेत. ते निवडून आले असले तरी मारकडवाडी गावातून त्यांना मतं मिळालेली नाहीत. ते जिंकलेत परंतु त्यांना पुनर्निवडणूक पाहिजे आहे. ते मतदान बॅलेटवर घ्या असं सांगत आहेत. त्यांच्या गावातील लोकांनी बॅलेटवर मतदान घेण्याचं मान्य केलं होतं, परंतु सरकारनं तिकडे पोलीस पाठवून ते सगळं थांबवण्यास सांगितलं. बॅलेटवर पुन्हा मतदान घ्यावं आणि ईव्हीएम मशीन बंद करा, अशी तिकडेच्या लोकांची अन् लोकप्रतिनिधींची मागणी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
...तर भाजपाच्या खासदाराचा पराभव झाला असता- सुळे : विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या उमेदवाराला स्वतःची मतंसुद्धा मिळालेली नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष वाईट पद्धतीनं फोडले गेलेत, आमची लढाई आजसुद्धा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु निवडणूक आयोगानं आणखी एक चूक केली. आम्हाला दिलेलं चिन्हं तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन्हीसाठी एकच शब्द तुतारी त्यांनी ठेवला. त्यामुळेच साताऱ्याच्या जागेवर आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, कारण ट्रम्पेट आणि तुतारी या दोन्ही चिन्हांमध्ये गोंधळ झाला होता. नाही तर भाजपाच्या खासदाराचा पराभव झाला असता. हे मी नव्हे, तर महायुती सरकारमधील एक मोठे नेते सांगत आहेत. तुतारी चिन्ह हटवण्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे विनंती केली, आम्ही 11 जागा तुतारी चिन्ह्याच्या गोंधळामुळे हरलो. त्यानंतर त्यांनी तुतारीला ट्रम्पेट नाव दिलं, परंतु ते चिन्ह तसंच ठेवलं. त्यामुळेच आम्ही साताऱ्याची जागा हरले आणि सत्ता पक्षानंही हे मान्य केल्याचंही सुप्रिया सुळे यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचाः
महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह