मुंबई - महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीज झाला. यामध्ये प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून सूरभी भोसले अभिनयात पदार्पण करत आहे, तर मृण्मयी देशपांडे यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तिच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा आम्ही इथं देत आहोत.
'एक राधा एक मीरा हे' खूप इंट्रेस्टिंग नाव आहे त्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल काय सांगशील?
'एक राधा एक मीरा' वरुन कल्पना येते की हा एक लव्ह ट्रँगल असणार. हे नाव लॉक झालं तेव्हा सर्वानाच ते भावलं. मलादेखील खूप समर्पक शीर्षक वाटतं कारण चित्रपटाच्या कथेला अनुरूप असं ते नाव आहे. या नावावरून प्रेक्षकांना कल्पना येईल की त्यांना काय बघायला मिळणार आहे. 'एक राधा एक मीरा' ही आजच्या काळातील अत्यंत देखणी फिल्म आहे, प्रेमकथेतील प्रेमाचा त्रिकोण असूनही त्याची वेगळी मांडणी केलेली फिल्म आहे, जी प्रेक्षकांना नक्की आवडेल. हिंदी सिनेमांत लार्जर दॅन लाईफ लव्ह स्टोरीज बघायला मिळतात तशीच ही मराठीतील लार्जर दॅन लाईफ लव्ह स्टोरी आहे. हा एक कम्प्लिट कमर्शियल चित्रपट आहे असे आम्ही म्हणू शकतो.
सुरुवातीला या चित्रपटाचं नाव वेगळं होतं. परंतु आताचं नाव जास्त समर्पक आहे असं वाटते का?
हो. नक्की वाटते. मी आधी म्हटल्याप्रमाणे टायटलवरून चित्रपटाची जातकुळी कळली तर प्रेक्षकांसाठी ते योग्य असतं. जर नाव प्रेक्षकांसोबत कनेक्ट होत नसेल तर 'ए कुठला रे तो सिनेमा’, किंवा ‘अरे तो नाही का’ असं होतं. ‘एक राधा एक मीरा’ बघायला जाऊया, इतकं नाव सोप्पं असलं पाहिजे. नाव चेंज झालं हे खूप बरं झालं.
महेश मांजरेकर यांच्याबरोबर तू आधीपण काम केलं आहेस. त्यांच्याबद्दल काय सांगू शकतेस?
महेश मांजरेकर म्हणजे एकदम राजा माणूस. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये माणसं आणि नाती यांना फार किंमत आहे. मला तर ते माझ्या बाबांसारखे वाटतात. मी त्यांच्याबरोबर चार वेळा काम केलंय आणि पुढंही अगणित वेळा त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. माझं म्हणाल तर मी कोणालाही सांगत नाही की, मला तुमच्याबरोबर काम करायचंय. परंतु महेश सर अपवाद आहेत. त्यांच्या सेटवर मी खूप कम्फर्टेबल असते. अगदी माहेरी आल्याचा फील येतो. खरंतर ते खूप चिडतात हे सर्वाना ठाउक आहे म्हणून अनेकजण घाबरतात. त्यांच्याबरोबर काम करणं कधी कधी अत्यंत ट्रॉमॅटिक अनुभव असू शकतो जर का तुम्हाला ते मनातून कसे आहेत हे माहिती नसेल तर. ते अगदी फणसासारखे आहेत. बाहेरून काटेरी परंतु आतून गोड. मला तर ते चिडले की खूप मज्जा वाटते कारण मी कधीही थेट बोलणी खालेल्ली नाहीत. खरंतर काम उत्तम केलं तर ते वारेमाप कौतुक करतात. मला खरंच खूप मज्जा येते त्यांच्या बरोबर काम करायला. एकदम रॉयल माणूस, अतीशय दिलदार व्यक्ती. खरंच त्यांचा कारभार राजासारखा असतो.
तुझे को-स्टार्स गश्मीर, सुरभी, संदीप यांच्यासोबत बॉण्डिंग कसं होतं?
गश्मीर आणि माझं अजिबात बॉण्डिंग नव्हतं. आमची खूप भांडणं व्हायची, बरेच वादविवाद झालेत. परंतु सीन्स बघताना ते तुम्हाला जाणवणार नाही. कारण आम्ही उत्तम अभिनय करू शकतो, आम्ही उत्कृष्ट नट आहोत (हसते). कधीकधी आमची भांडणं इतकी विकोपाला जायची की शूटिंग होईल की नाही याचं युनिटला टेन्शन यायचं. शूटच्या शेवटाला आम्हाला साक्षात्कार झाला की 'आपण इतके का भांडत होतो?' त्यानंतर आमची दोस्ती झाली ती इतकी की मी मुंबईला आले की हक्काने गश्मीरच्या घरी जाते. संदीप तर कायमच मित्र होता, परंतु तो आमच्या भांडणात कधीच पडला नाही. सुरभीबरोबर माझं एक वेगळचं ट्युनिंग जमलं होतं. म्हणजे मला जेव्हा अडचण असते, तेव्हा तिची आठवण येते. मला काहीही मदत लागते तेव्हा महाबळेश्वरहून माझा पहिला फोन सुरभीला जातो. आमचा बहिणी सारखा बॉन्ड झाला आहे, ती मला मयी म्हणून बोलावते. आताच्या घडीला ती राजकारणामध्ये सक्रिय आहे तरीही आमचं इक्वेशन काहीच बदललेल नाहीये.
तुमचा चित्रपट परदेशात शूट झालाय. एकंदरीत मराठी चित्रपट परदेशी चित्रित करण्याबाबत तुझे काय मत आहे?
फॉरेन शूट हे फार ट्रिकी आहे. प्रॉडक्शन हाऊस कुठलं आहे त्यावर अवलंबून असते शूट चांगलं होईल की वाईट. माझ्या फॉरेन मध्ये शूट करून अडकलेल्या सुद्धा फिल्म्स आहेत. तसेच फॉरेनला अत्यंत कम्फर्टेबल वातावरणात मी शूट केलं आहे. परदेशी चित्रीकरणाच्या दोन्ही बाजू मी अनुभवल्या आहेत. जर का तुम्हाला फॉरेन कंट्री मध्ये शूट करणे झेपत असेल तरच करावं ह्या मताची मी आहे पण फक्त फॉरेनला जाऊन शूट करायच आहे या हव्यसा पोटी तिकडे जाऊन शूट करणं जोखमीचं असते असे माझे स्पष्ट मत आहे.
मराठीत बरेच चित्रपट लंडन आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकेशन्सवर चित्रित झालेले आहेत. तुम्ही स्लोव्हेनिया मध्ये शूट केले. त्याबद्दल काय सांगशील?
आमच्या चित्रपटातील लोकेशन्स एकदम नवीन आहेत. ‘एक राधा एक मीरा’ हा सिनेमा एक विजुयल ट्रीट आहे. तुम्ही वेडे व्हाल त्यातील लोकेशन्स बघून. महेश मांजरेकरांची दृष्टी याला कारणीभूत आहे. त्यांच्या चित्रपटांत लोकेशन्स सुंदर असतातच पण तो ग्रँडनेस सुद्धा आला पाहिजे किंवा तुमची ताकत पाहिजे तिथे शूट करायची. त्यांची व्हिजुअलाइजेशन पॉवर जबरदस्त आहे कारण देखणी लोकेशन्स आपल्या कॅमेऱ्यातून अजून उठावदार कधी दिसतील ह्याची ते काळजी घेतात. सिनेमा सुंदर दिसायला वेगळी नजर असावी लागते, आर्थिक पाठिंबा लागतो तसेच व्हिजुअलाइजेशन चांगलं असायला लागतं आणि डी ओ पी सुद्धा फक्कड असावा लागतो. या सर्वांच्या माध्यमातून सिनेमा देखणा होतो, जसा आमचा 'एक राधा एक मीरा' हा चित्रपट.
तू शहरातून गावाकडे राहायला गेली आहेस. त्याबद्दल काही सांग.
मी आणि माझं कुटुंब महाबळेश्वरला राहतो. मी खूप खूष आहे. मला मोकळेपण मिळतं तिकडे. म्हणजे थेट ग्लॅमर ते माती असा माझा प्रवास आहे. इथे माझ्या लाइफचा बॅलन्स पण टिकून राहतो. मी ज्यांची ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून काम करते, जे सगळे ब्रॅंड आहेत, त्यांच्यावर माझा खरंच खूप विश्वास आहे, कारण तुम्ही एखाद्या गोष्टी ला ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न करताय ती एक जबाबदारी आहे. शेतीला परत ग्लॅमर मिळावं, मातीच्या घराचं महत्त्व शहरी लोकांना कळावं, हे माझं आणि स्वप्नीलच स्वप्न आहे. अर्थात आमचं आयुष्य खूप बदललंय, मला पॉजिटिव परिणाम दिसताहेत. आम्ही खूप जास्त आरोग्यदायी झालो आहोत.
तू वर्क-लाइफ बॅलन्स कसं करतेस?
माहिती नाही पण तो होतो आणि ह्याच श्रेय मी पूर्णपणे माझ्या इंडस्ट्री ला देईन. आता मी इथे १०-१२ दिवस महिना-महिना असते पण लोक मीटिंग साठी थांबतात, पोस्ट प्रॉडक्शन साठी थांबतात. स्वप्नील चे वर्कशॉप्स असतात, त्यात माझाही सहभाग असतो. सगळ्या मित्र मैत्रिणीचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे हे जमू शकत आहे. खूप सांभाळून घेतले आहे मला ह्या सगळ्यांनी.
तुझा अभिनय क्षेत्रात वावर आहेच पण तू लिहतेसही छान, डायरेक्शन चांगलं करतेस तर त्याच काय आता पुढे ?
'मनाचे श्लोक' हा माझा पुढचा सिनेमा ह्या वर्षी प्रदर्शित करू आम्ही, तर त्याच्या साठी आपली वेगळी भेट होईलच.