मुंबई Mahavir Jayanti 2024 :आज देशभरात जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी होत आहे. हा उत्सव जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थंकर स्वामी महावीर यांना समर्पित असून हा दिवस खूप विशेष आहे. जैन धर्माच्या मान्यतेनुसार महावीरजींचा जन्म हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला झाला होता. या दिवशी जैन धर्माचे लोक भगवान महावीरांची पूजा करुन सुख - समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भगवान महावीरांनी जगाला दिलेले पंचशील तत्व आजही लोकांचे मार्गदर्शन करते. राजाच्या घरी जन्मलेले वर्धमान जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कसे बनले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भगवान महावीर यांनी केला त्याग : भगवान महावीर स्वामींचा जन्म कुंडग्राम येथे इ. स. पूर्व 599 मध्ये वज्जी प्रजासत्ताकचा राजा सिद्धार्थ यांच्याकडं झाला होता. त्यांच्या आईचे नाव त्रिशला होतं, त्यांना प्रियकारिणी असेही म्हणतात. कुंडग्राम हे सध्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात येते. राजा सिद्धार्थाच्या घरी वर्धमानाचा जन्म होताच राज्यात मान, प्रतिष्ठा आणि संपत्तीमध्ये भरभराट होऊ लागली, त्यामुळेचं त्यांचं नाव वर्धमान असं ठेवण्यात आलं होतं. वर्धमान हे सुरुवातीपासूनच धैर्यवान आणि निर्भय स्वभावाचे होते. त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी राजवैभवाचा त्याग करुन संन्यास घेऊन आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकार करुन एक प्रवास सुरू केला. सुमारे 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांनी आपल्या इच्छा आणि दुर्गुणांवर नियंत्रण मिळवले.
महावीर स्वामींनी केली चार तीर्थांची स्थापना :यानंतर त्यांना यादरम्यान कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. या कठोर तपश्चर्येनंतरच वर्धमान यांना महावीर म्हटलं गेलं. कैवल्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महावीर स्वामींनी चार तीर्थांची स्थापना केली. यामध्ये साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका यांचा समावेश आहे. हे ऐहिक तीर्थ नसून एक तत्व आहे. यामध्ये सत्य, अहिंसा, एकपत्नीत्व आणि तपस्याचे पालन करुन आत्म्याला तीर्थ बनवण्याचा मार्ग जैन धर्मामध्ये आहे. यानंतर स्वामी महावीर यांनी वयाच्या 72 व्या वर्षी पावापुरी येथून मोक्ष प्राप्त केला. भगवान महावीरांनी लोकांना समृद्ध जीवन आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी पाच तत्त्वे सांगितली होती. याला महावीरांची पाच तत्त्वे म्हणतात.
महावीरांची पाच तत्त्वे :
अहिंसा-भगवान महावीरांचे पहिले तत्व अहिंसा असून या तत्वात त्यांनी जैन लोकांना प्रत्येक परिस्थितीत हिंसेपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. चुकूनही कोणाचे मन दुखवू नये, असेही त्यांनी सांगितले.