प्रयागराज:पौष पौर्णिमेला महाकुंभ मेळाव्यात ( Mahakumh Mela 2025 ) आलेले भाविक मोठ्या संख्येनं संगम किनाऱ्यावर पोहोचले आहेत. गंगा, यमुना आणि 'गुप्त' असलेल्या सरस्वती नदीचा प्रयागराज येथे संगम झाला आहे. झांज आणि ढोल वाजवून अनेक भाविक भजन गात असल्याचं दिसून येत आहे.
महाकुंभ मेळाव्यात ७ स्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रविवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील ४ दिवसांसाठी महाकुंभ परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महाकुंभाच्या पहिल्या स्नानापूर्वीच रविवारी सुमारे ५० लाख भाविकांनी संगम येथे स्नान केले. रविवारी रात्री रिमझिम पाऊस असताना प्रतिकूल वातावरणातही लाखो भाविक प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. "हर-हर महादेव", "हर-हर गंगे" अशा भाविकांकडून घोषणा दिल्या जात आहेत. १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या पहिल्या अमृत स्नानापासून सर्व आखाडे त्यांच्या क्रमानुसार महाकुंभ मेळाव्यात स्नान करणार आहेत.
अनिवासी भारतीय जर्मनीवरून मेळाव्याकरिता दाखल- महाकुंभ मेळाव्याचे विदेशातदेखील आकर्षण आहे. महाकुंभ मेळाव्यातील स्नानासाटी जर्मनीवरून जितेश प्रभाकर हे पत्नी सास्किया नॉफ आणि मुलगा आदित्यसह महाकुंभ मेळाव्यात पोहोचले आहेत. विदेशातील अनेक भाविकांनी देखील पवित्र समजल्या जाणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात स्नान घेतले.
- महाकुंभ मेळाव्यासाठी रशियन महिला दाखल झाली. रशियन महिला म्हणाल्या, "मेरा भारत महान. भारत हा एक महान देश आहे. मी पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आले आहे. येथून आपण खरा भारत पाहू शकतो - खरी शक्ती भारतातील लोकांमध्ये आहे. या पवित्र ठिकाणाच्या वातावरणामुळे भारावून गेले आहे. मला भारत आवडतो."
- महाकुंभात स्नान करणारे ब्राझीलमधील फ्रान्सिस्को म्हणाले, "मी योगाभ्यास करतो. येथे भारतात मी मोक्ष शोधत आहे. भारत म्हणजे जगाचे आध्यात्मिक हृदय आहे. पाणी थंड असले तरी भक्तीचा ऊबदारपणा ह्रदयात आहे".
शाही स्नानाचा मुहूर्त-या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी आहे. पहिले शाही स्नानदेखील याच दिवशी असणार आहे. भारतीय ज्योतिष संशोधन परिषदेच्या प्रयागराज अध्यायाच्या अध्यक्षा डॉ. गीता मिश्रा त्रिपाठी यांच्या माहितीनुसार महापुण्यकालचा कालावधी सकाळी ९:०३ ते १०:५० पर्यंत असणार आहे. हा कालावधी १ तास ४७ मिनिटाचा असणार आहे.
- शाही स्नानाचा ब्रह्म मुहूर्त पहाटे ५.२७ ते ६.२१ पर्यंत असेल. विजय मुहूर्त दुपारी २.१५ ते २.५७ पर्यंत असेल. संध्याकाळी ५.४२ ते ६.०९ पर्यंत मुहूर्त असेल. याच क्रमाने, पौष पौर्णिमा स्नान १३ जानेवारी रोजी होत आहे. पौर्णिमा तिथी पहाटे ५.०३ वाजता सुरू होईल.
- पौष पौर्णिमा स्नान १३ जानेवारी शुभ मुहूर्त: या दिवशी कोणत्याही वेळी स्नान करणे शुभ मानले जाते. याशिवाय इतरही अनेक शुभ काळ आहेत. पौष पौर्णिमेला ब्रह्म मुहूर्त पहाटे ५.३० ते ६.२४, अमृत चौघडिया सकाळी ७.१५ ते ८.३४, शुभ चौघडिया सकाळी ९.५२ ते ११.११, लाभ चौघडिया दुपारी ३.७ ते ६.२५ हे मुहूर्त असणार आहेत.
- १४४ वर्षांनंतर दुर्मिळ योग:डॉ. गीता मिश्रा त्रिपाठी म्हणाल्या की, १४४ वर्षांनंतर महाकुंभात एक दुर्मिळ शुभ योग घडत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करून उत्तरायण सुरु होतो. मकर संक्रांतीला गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या काळात, व्यक्ती स्नान करून, दान करून आणि तीळ आणि गूळ खाऊन पुण्य मिळवते. या दिवशी खिचडी, मीठ, काळे तिळ, गूळ आणि तूप यांचे दान अत्यंत फलदायी मानले जाते.
हेही वाचा-
- महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या नागा साधुंचा काय इतिहास आहे? जाणून घ्या, सविस्तर माहिती
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिकचा होणार कायापालट, 6 हजार 900 कोटींचा आराखडा सादर