चेन्नई :Udayanidhi Stalin : मद्रास उच्च न्यायालयाने आज बुधवार तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, शेखर बाबू आणि खासदार ए. राजा यांच्या विरोधात रिट ऑफ क्वॉ वॉरंटो (Writ of Quo Warranto) देण्यास विरोध केला. एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक पदावरून दूर करायचं असल्यास 'रिट ऑफ क्वॉ वॉरंटो' दिला जातो. सनातन धर्माविरोधात टिप्पणी केल्यामुळे या मंत्र्यांना पदावरून दूर करावं यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, न्या. अनिता सुमंथ यांनी द्रमुकच्या नेत्यांना सनातन धर्मावरील टिप्पणीबाबत चांगलंच झापलं आहे.
मंत्री पदावरून हटवण्याची मागणी फेटाळी : उदयनिधी यांना मंत्री पदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सनातन धर्माविरोधात वक्तव्याबाबत हिंदू संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाकडून 'रिट ऑफ क्वॉ वॉरंट' जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. ज्यामध्ये मंत्र्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याबद्दल जाब विचारला जाऊ शकतो. मात्र, न्यायालयाने हिंदू संघटनांची मागणी फेटाळून लावली. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, उदयनिधी यांनी कोणत्या अधिकाराखाली अधिकृत पद भूषवलं आहे? त्यावर सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने मंत्री पदावरून हटवण्याची मागणी फेटाळून लावली.
तुम्हाला काही भान आहे का? : संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने समाजात फूट पडेल असं विधान करू नये, अशी समज उच्च न्यायालयाने दिली. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्ही, एड्स, मलेरिया अशा रोगांशी केल्यामुळे हे विधान विकृत आणि संविधानाच्या विरोधात आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, यावर सर्वोच्च न्यायालयाने "तुम्ही अधिकाराचा गैरवापर करत आहात, हे तुमच्या लक्षात येत आहे का? याचे परिणाम काय होतील, हे तुम्हाला समजायला हवे होते. तुम्ही मंत्री आहात, कोणी सामान्य व्यक्ती नाही," अशा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना नुकत्याच झालेल्या सुनावणीत फटकारलं होतं.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन? : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी संबंधित विधान केलं होतं. तसंच, नंतर त्यांना अनेक प्रसंगी विचारणा केली असता आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं होतं. "सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं", असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.