नवी दिल्ली : भाजपा हा लोकशाहीच्या मुळावर आलेला पक्ष आहे. त्यामुळे आम्ही लोकसभेला एकत्र लढलो, तसं आता विधानसभेत लढायला पाहिजे होतं. मात्र काँग्रेस नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न अयोग्य आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आज दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ची तारीख निवडणूक आयोगाकडून घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी दिल्ली निवडणुकीवर भाष्य केलं. दुसरीकडं त्यांनी अजित पवार हे नेते नाहीत, तर ते अॅक्सिडेंटल नेते आहेत, असा हल्लाबोल केला. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगाण गाणाऱ्या संजय राऊत यांनी मनमोहन सिंगांवर विश्वास आहे, मात्र पंतप्रधान मोदींवर विश्वास नसल्याचंही स्पष्ट केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उबाठा, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आदी पक्ष एकत्र लढले. त्यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांना चांगलाच दणका बसला. मात्र आता दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यावरुन संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. काँग्रेस नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 भाजपापुढं तगडं आव्हान उभं करणं गरजेचं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीनं एकत्र लढण्याची आवश्यकता आहे. भाजपा हा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला सत्तेपासून रोखून नायनाट करणं गरजेचं आहे. उबाठाचं याबाबत अजिबात समर्थन नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार अॅक्सिडेंटल नेते : बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. वाल्मिक कराड यांच्यावरील आरोपावरुन विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात येत आहे. या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. "अजित पवार हे नेते नाहीत, तर ते अॅक्सिडेंटल नेते आहेत. आम्हाला बिना पुराव्याचं अटक केलं, त्यावेळी कोणते पुरावे होते. आता मात्र त्यांना पुरावे पाहिजे. अजित पवार तेव्हा काहीच बोलले नाहीत. आता पुरावे असूनही कोणतीच कारवाई करण्यात येत नाही," असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास म्हणजे धूळफेक : "संतोष देशमुख हत्याकांडात सगळे पुरावे समोर आहेत. मात्र आरोपींवर कारवाई करण्यात येत नाही. खरे आरोपी बाहेर आहेत. बीड प्रकरणात पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बदलायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माफिया मित्रांना संभाळत आहेत. यामुळे राज्य सटकून जाईल, खतम होईल. माफियांनी बीड पोलीस खातं पोखरुन ताब्यात घेतलं आहे. सगळे पुरावे समोर आले असून अजित पवार यांना कोणते पुरावे हवे आहेत," असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.
मनमोहन सिंगावर विश्वास, मात्र पंतप्रधान मोदींवर विश्वास नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या दोनच नेत्यांनी दिवाळी सरकारी पैशातून साजरी केली असल्याचा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावेळी "माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आपला विश्वास आहे, त्यांनी त्यांच्या पैशातून दिवाळी साजरी केली असेल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपला काडीचाही विश्वास नाही. भाजपा नेत्यांवर आपण विश्वास ठेऊ शकत नाही. विदेशी दौऱ्यात 20 हजार डॉलरची भेट देणाऱ्या नेत्यानं दिवाळी आपल्या पैशानं साजरी केली असेल," असा सवालही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :