नवी दिल्ली :लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पाचव्या रांगेत बसवल्यानं काँग्रेसच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांचा अपमान करण्याच्या उद्देशानं त्यांना जाणीवपूर्वक मागच्या रांगेत बसवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला. याबाबत आता संरक्षण मंत्रालयानं उत्तर दिलं आहे. त्यांना मागं का बसवण्यात आलं याचं कारणही दिलंय. संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की, "ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना पुढच्या रांगेत स्थान देण्यात आलं. त्यामुळं राहुल गांधींना मागच्या रांगेत जागा देण्यात आली."
विरधकांना सन्मान द्याचा नाही? : राहुल गांधींना पाचव्या रांगेत स्थान दिल्यावरून संरक्षण मंत्रालयाचं विधान म्हणजे मूर्खपणाचं लक्षण असल्याची काँग्रेसनं टीका केली आहे. “ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सन्मान द्यायला हवा. विनेश फोगट यांनाही सन्मान दिला पाहिजे. पण, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांना हा सन्मान त्यांना द्यायचा नाही का?," असा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसनं पुढं म्हटलंय की, "राहुल गांधींना पाठीमागं बसवल्यानं सरकारला लोकशाही परंपरा तसंच विरोधी पक्षनेत्याचा आदर नसल्याचं दिसून येतं."
आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाच्या वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाचव्या रांगेत बसण्यात आलं. केंद्र सरकारनं हे जाणूनबुजून केलंय. विरोधी पक्षनेत्यामुळं सरकार अस्वस्थ आहे. त्यामुळं त्यांना मागच्या रांगेत बसवण्यात आलं. - सुप्रिया श्रीनेट, राष्ट्रीय प्रवक्त्या काँग्रेस