सोलापूर : श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन जाताना भाविकांच्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात झाला. यात चार भाविक जागीच ठार झाले आहेत. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन गाणगापूर येथे जाताना स्कॉर्पिओ आणि मालवाहतूक ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या घटनेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 7 भाविक जखमी झाले आहेत. आज (1 जानेवारी) बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला आहे.
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अक्कलकोट ग्रामीण स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत भाविक आणि जखमी भाविकांची नावे : स्वामींचं दर्शन घेऊन गाणगापूर येथे भाविक निघाले होते. अक्कलकोटहून गाणगापूर येथे जाताना स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात सागरबाई गंगाधर कर्णपल्ली (वय 40 वर्षे,रा केरूर,जि नांदेड), वैष्णवी हणमंत पाशावर (वय 14 वर्षे, रा केरूर जि नांदेड), गंगाधर कर्णपल्ली (वय 45 रा,केरूर जि नांदेड), हणमंतु गंगाराम पाशावर (36 वर्षे,रा केरूर,नांदेड) या भाविकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये नामदेव बालाजी वाडीकर (29 वर्षे,रा नांदेड), ऋतुजा मोहन शीरलेवाड (वय 5 वर्षे, रा केरूर नांदेड), योगेश मोहन शीरलेवाड (वय 5 वर्षे,रा,केरूर जि नांदेड), तेजस गंगाधर मानवते (वय 30 वर्षे,आरोळ हिंगोली), कार्तिकी श्रेयस गुप्ता (वय 2 वर्षे,रा.खेड पुणे), सविता हणमंत पायावल (वय 40 वर्षे,कुंडलगी,नांदेड), पिंटू बाबूलाल गुप्ता (वय 28 वर्षे,रा चाकण पुणे), आकाश हणमंत पायावल (वय 10 वर्षे,रा,कुंडलगी नांदेड), जयश्री गुप्ता (वय 25 वर्षे पुणे), छाया मोहन शीलेवाड (वय 35 वर्षे,रा,नांदेड) अशी जखमी भाविकांची नावे आहेत.
देवदर्शनासाठी नांदेडहून निघाले.... : अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्व भाविक नांदेड, पुणे जिल्ह्यातील आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गणगापूर येथील श्री दत्तच्या मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार ते नांदेडमधून सोलापूरला आले होते. त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारने गणगापूरच्या दिशेनं जात होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
हेही वाचा -