बीड : मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या हत्याकांडातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात सीआयडीला यश आलं आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपींना बीड पोलिसांच्या हवाली केलं आहे. या दोन्ही आरोपींना आता केज पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे.
सीआयडीनं पकडले संशयित मारेकरी : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील दोन आरोपी सीआयडीच्या पथकानं पकडले आहेत. त्यांना नेकनूर येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या या हत्याकांडानं राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना सीआयडीनं पकडलं आहे. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पथक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 637/2024 कलम 103(2),140(1),126, 118(1),34(4),324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणं गंभीर गुन्हा दाखल आहे.
पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं दोन आरोपींना पकडलं आहे. मात्र पकडण्यात आलेले हे दोन आरोपी हे प्यादे आहेत, मुख्य आरोपी आका आहे. मी म्हणालो होतो, बकरे की अम्मा कब तक दुवा मांगेगी, आज दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष पथकानं त्यांना अटक केल्याची माहिती मिळते, त्यांचं अभिनंदन. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये चालू असलेल्या चौकशीमध्ये आपण समाधानी आहोत," असं आमदार सुरेश धस म्हणालेत
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा - संदीप क्षीरसागर : "या प्रकरणामध्ये मास्टरमाईंड असलेले वाल्मिक कराड हे बीडच्या शहर पोलीस ठाण्यात बंद आहेत. या सर्व गोष्टींमध्ये कोण यांचा पाठीराखा आहे, हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे या कालावधीत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व प्रकरण निवाळल्यानंतर कोणतं पद घ्यायचं ते घ्यावं," असं मत संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :