मेष (Aries) : या वर्षाची सुरूवात आपल्यासाठी अनुकूल होण्याची संभावना आहे. यावर्षी कुटुंबातील एखाद्याचा विवाह होऊ शकतो. जे संतती प्राप्तीस इच्छुक आहेत, त्यांची ही इच्छा यावर्षी पूर्ण होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात अनुकूल आहे. आपण प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधू शकाल. या संपूर्ण वर्षात आपले संबंध सुधारण्यावर आपणास लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. आपणास वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याच्या संधी मिळेल. आपसातील समन्वय चांगला असेल. एकमेकांपासून लाभ सुद्धा होईल. वर्षाच्या सुरूवातीला कौटुंबिक तणाव वाढू शकतो. यावर्षात आपल्या खर्चात वाढ होईल, ज्याचा परिणाम आपल्या खिश्यावर होत असल्याचं दिसून येईल. आर्थिक स्थितीत चढ-उतार होत असल्याचं दिसले, तरी आपण चांगली अर्थ प्राप्ती करण्यात यशस्वी व्हाल. एकाहून अधिक कामातून धन प्राप्तीचे मार्ग आपणास दिसू लागतील. ह्या वर्षात आपण एखादी मोठी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता, त्यामुळं आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. आपल्या गोड बोलण्यानं इतरांकडून आपले काम करवून घेण्यात आपण यशस्वी व्हाल. कारकिर्दीसाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसायात सुद्धा चांगला पाठिंबा मिळेल. व्यावसायिक भागीदाराशी जवळीक वाढेल. व्यापारात चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना यावर्षी वरच्या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. तसेच पगारवाढ सुद्धा होऊ शकते. कार्यक्षेत्री काही लोक आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतात, त्या बद्धल सतर्क राहावे. तसेच तीर्थयात्रा करण्याची मोठी संधी मिळेल. दूरवरच्या प्रवासात आपणास मान-सन्मान प्राप्त होऊन आपली सामाजिक प्रतिमा उंचावेल. आई-वडिलांची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते. असं असलं तरी वर्षाच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. स्वतःवर विश्वास ठेवल्यानं आपली सर्व कामे होऊ लागतील. इतरांना सुद्धा मदत करा. या वर्षात एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे आले तरी सुद्धा ते परीक्षेत यशस्वी होतील. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. हे वर्ष उच्च शिक्षणासाठी चांगलं आहे. या वर्षात आपली एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आपण आजारी पडण्याची शक्यता असल्यानं आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीकडं अजिबात दुर्लक्ष करू नये. संततीकडून सुख मिळेल. या वर्षात परदेशी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते.
वृषभ (Taurus) : या वर्षाची सुरूवात आपल्यासाठी चांगली होणार आहे. आपल्या काही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्यानं या वर्षात आपण अत्यंत आनंदित व्हाल. आपल्या योजना यशस्वी होतील. कार्यात यश प्राप्ती होईल. आपले आत्मबल वृद्धिंगत होईल. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याने आपणास जीवनात आनंद प्राप्त होईल. आपण आपल्या उत्तम निर्णय क्षमतेमुळं आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनास उत्तम प्रकारे हाताळू शकाल. तसेच त्या दोघात उत्तम समतोल सुद्धा साधू शकाल. कुटुंबात भावंडात कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपल्या धाडसाचा दुरुपयोग करणे टाळा. त्यास दुःख देऊ नका. या वर्षात प्रणयी जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान सामंजस्याचा अभाव असल्याचं दिसून येईल. त्यामुळं निष्कारण समस्या उदभवू शकतात. या समस्यांमुळं आपल्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. व्यापारी प्रवृतींसाठी वर्षाची सुरूवात उत्तम राहील. आपण केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आपणास चांगला धनलाभ झाला तरी आपली जोखीम पत्करण्याची पद्धत काहीशी समस्या निर्माण करणारी असण्याच्या शक्यतेमुळं आपणास सतर्क राहावं लागेल. यावर्षी आपल्या प्राप्तीत वाढ होणार असल्यानं आपण आपल्या योजना योग्य मार्गाने पुढे रेटू शकता. कार्यक्षेत्री आपणास खूप मेहनत करावी लागेल आणि त्यामुळं आपल्या स्थितीत सुधारणा होईल. अनेकदा आपणास कार्यालयात जास्त वेळ थांबावयास सुद्धा लागू शकते. ह्यास डोकेदुखी समजू नका, वर्षाच्या मध्यास आपणास त्याचा लाभ मिळत असल्याचं दिसू लागेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत करण्याचं आहे. ते अभ्यासावर जितके जास्त लक्ष केंद्रित करतील तितके ते खोलवर अभ्यास करू शकतील. त्यांनी जर तसं केलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. वर्षाचा उत्तरार्ध आपल्यासाठी धनवृद्धीस सहाय्यक होईल. त्यामुळं आपण आपले खर्च नियंत्रित करण्यात यशस्वी व्हाल. यावर्षी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपण धनवान व्हाल. ह्या वर्षात कंबरदुखी आपणास त्रास देऊ शकते. तेव्हा आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर लक्ष केंद्रित करावं. त्यासाठी आपणास कदाचित आपल्या दिनचर्येत बदल करावा लागू शकतो. आपण जर खेळाडू असाल तर ह्या वर्षी महत्वाच्या स्पर्धेत यशस्वी होऊन एखादा पुरस्कार सुद्धा मिळवू शकाल.
मिथुन (Gemini) : 2025 च्या सुरूवातीस आपल्या विचारात धार्मिकता वाढण्याची संभावना आहे. धर्म, कर्म कार्यात आपले मन जास्त रमेल. पूजा करण्यात, तीर्थयात्रा करण्यात तसेच त्यांचे दर्शन घेण्यात आपलं मन रमू शकते. यावर्षी कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. कुटुंबात आपसात वाद होऊ शकतात. आपसात समन्वयाचा अभाव असल्यानं कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते. ह्या वर्षात प्रवास होतील, ज्यात आपल्या काही नवीन ओळखी होतील. अर्थात ह्या प्रवासांमुळं काही शारीरिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनास वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल असू शकते. आपसात ओढाताण व भांडण-तंटे होण्याची संभावना असली तरी उत्तरार्ध सुखावह होऊ शकतो. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात उत्तम असेल. आपसातील समन्वय उत्तम असल्यानं आपल्या नात्यात सुधारणा होईल. यावर्षी आपल्या प्रेमिकेसह दूरवरचे प्रवास संभवतात. वर्षाच्या सुरूवातीपासून आपल्या बोलण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो, ज्यामुळं आपली माणसे दुखावली जाऊ शकतात. आपल्या वाणीत माधुर्या ऐवजी कडवटपणा वाढू शकतो. आपण निष्कारण क्रोधीत सुद्धा होऊ शकता. त्यामुळं आपली माणसे दुखावले जाऊ शकतात. हे वर्ष विद्यार्थ्यांना काही तरी करून दाखविण्याची संधी घेऊन येत आहे. त्यामुळं त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील. ह्या वर्षी परदेश प्रवास सुद्धा संभवतात. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा करू शकाल. आपण जर मुलांसंबंधी काही स्वप्ने बघितली असली तर ती यावर्षी पूर्ण होऊ शकतील. उच्च शिक्षणात सुद्धा उत्तम यश प्राप्ती होऊ शकते. वर्षाच्या सुरूवातीपासून आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्री आपणास चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. ह्या वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या नोकरीत बदल संभवतो. वर्षाच्या सुरूवातीस व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाची वृद्धी होईल. आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा वाढेल. काही नवीन कंत्राट मिळाल्यानं आपणास लाभ होईल. वर्षाचा उत्तरार्ध काहीसा कमकुवत होऊ शकतो.
कर्क (Cancer) : या वर्षाची सुरूवात आपणास काही अनुभव देणारा आहे. ह्या दरम्यान आपणास काहीतरी नवीन शिकावयास मिळेल. वर्षाच्या सुरूवातीस मानसिक तणावाचा त्रास झाला तरी मार्च महिन्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आपल्या कार्यात येणाऱ्या समस्या सुद्धा दूर होतील. आपल्या व्यापाराची सुद्धा उन्नती होईल. दीर्घ काळापासून आपल्या मनात आपण काही गोष्टी दडवून ठेवल्या होत्या, त्या आकारास येण्याचे हे वर्ष आहे. आपण आपल्या व्यापार विस्तारासाठी नवनवीन ठिकाणी प्रवास कराल. दूरवरच्या प्रवासात आपल्या नवीन ओळखी होतील, ज्या आपल्या व्यवसायास नवीन उंचीवर घेऊन जाण्यास मार्गदर्शक ठरतील. नोकरी करणाऱ्यांना ह्या वर्षी आपली कुवत दाखविण्याची संधी मिळेल. नोकरीत एखाद्या मोठ्या पदावर आपली नियुक्ती होऊ शकते. आरोग्याच्यादृष्टीनं वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल असल्यानं आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्यांवर आपणास लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध जास्त अनुकूल आहे. ह्या दरम्यान त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार उत्तमोत्तम करण्याची संधी मिळाल्यानं अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. मित्रांशी कटुता आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकते. कुटुंबात सुद्धा भावंडांशी आपले वाद संभवतात. त्यामुळं आपला तणाव वाढू शकतो. वेळ मिळाल्यावर आपण ह्या समस्या समजून घेऊन त्यांचं निराकरण करून घ्याल. ज्यात आपण यशस्वी होऊ शकाल. २०२५ चे वर्ष आर्थिकदृष्ट्या यशदायी आहे. आपणास आर्थिक चणचण जाणवणार नाही. आपली बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपण नवनवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकाल. त्यामुळं आपली आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत राहील. वर्षाच्या उत्तरार्धात परदेशी जाण्यात आपण यशस्वी होऊ शकता. यावर्षी आपणास सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होऊ शकतो. उच्च पदस्थ व्यक्तींशी आपल्या ओळखी होऊ शकतात. आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते. आपल्या महत्वाकांक्षा आपणास उंचीवर घेऊन जाईल. आपण राजकारणात सुद्धा प्रवेश करू शकता. जो प्रगती करण्यास आपल्याला मदत करू शकेल असा एखादा चांगला मार्गदर्शक आपणास मिळू शकेल. वर्षाच्या सुरूवातीस उत्साहाच्या भरात घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आपण तसे केलेत तर यावर्षी यशस्वी होण्यापासून आपणास कोणीही रोखू शकणार नाही. आपलं यश आपणास सामाजिक स्तरावर एक महत्वाची व्यक्ती बनवून ठेवेल.
सिंह (Leo) : २०२५ ची सुरूवात आपल्यासाठी चांगली होईल. वैवाहिक जीवनात तणाव असून सुद्धा प्रेमाचे अंकुर फुटल्यानं नाते, प्रेम आणि रोमांसाने भरलेले राहील. वर्षाच्या मध्यास तणाव असल्याचं दिसलं तरी नंतर परिस्थिती सामान्य होईल. आपणास अचानकपणे काही बदलांना सामोरे जावं लागू शकतं. हे आपल्या आयुष्यासाठी बदलाचे वर्ष असेल. काही बदल आपल्या दिनचर्येत बदल घडवतील, ज्यावर आपणास विशेष विचार करावा लागू शकतो. हे बदल आपणास नवीन काहीतरी करण्यास प्रेरित करतील. कुटुंबातील व्यक्तींशी सुखद संवाद घडतील. एकमेकांत उत्तम समन्वय राहील. मुलांची प्रगती पाहून आपण अत्यंत खुश व्हाल. आपले आत्मबल उत्तम असेल. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल असेल. आपसात वाद होण्याची संभावना आहे. एकमेकांचा अहंकार दुखावला जाण्याची शक्यता सुद्धा आहे. आपण कार्यक्षेत्री यशस्वी व्हाल. आपण आपल्या अनुभवाचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. आपली बुद्धिमत्ता आपणास यश प्रदान करेल. नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. वर्षाच्या उत्तरार्धात पदोन्नती संभवते. ह्या वर्षाच्या सुरूवातीस आपणास थोडं सावध राहावं लागेल, अन्यथा प्रकृतीच्या तक्रारी आपणास त्रस्त करतील. मुलांचं प्रेम मिळू शकेल. आपण आपल्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा पूर्ण वापर करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळं आपली कार्यक्षमता वृद्धिंगत होईल. आपण आपल्या आवडीचा एखादा व्यापार सुद्धा सुरु करू शकता. खर्चात वाढ झाल्यानं पैश्यांची बचत करण्यात अडचण येऊ शकते. त्याचा प्रभाव आपल्या बचतीवर होऊ शकतो. आपणास त्याकडं लक्ष द्यावं लागेल. वर्षाच्या मध्यास धर्म-कर्म कार्यात आपणास निव्वळ आर्थिक प्राप्तीच होणार नसून आपली सामाजिक प्रतिमा सुद्धा उंचावणार आहे. आपले सामाजिक वर्तुळ वाढेल. समाजात सन्मानित व्यक्तीच्या रूपात आपला स्वीकार करण्यात येईल. विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखविण्याची संधी घेऊन येणारे हे वर्ष आहे. आपण आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला तर या वर्षात आपण खूप उन्नती करू शकाल. यावर्षी प्रकृती काहीशी नरमच राहील. आहारावर लक्ष ठेवावं लागेल. विरुद्ध प्रकृतीचे पदार्थ भक्षण केल्यानं आरोग्याशी संबंधित समस्या सतत आपणास त्रास देऊ शकतात. वर्षाच्या सुरूवातीस एखादी दुखापत किंवा दुर्घटना संभवत असल्यानं वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. वर्षाच्या अखेरच्या दिवसात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
कन्या (Virgo) : २०२५ च्या सुरूवातीस आपणास मानसिक तणाव आणि बेचैनी जाणवेल. कार्यात यश न मिळाल्यानं आपलं मन निराश होऊ शकते. आपल्या कुटुंबियांशी असलेल्या संबंधात अहंकार आड येणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात सुद्धा काही समस्या उदभवू शकतात. त्यामुळं आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान काही सामान्यता राहणार नाही. ही स्थिती टाळण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. ह्या वर्षात व्यापाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. मात्र, दूरवरचे प्रवास करून आपणास लाभ होईल. नशिबाची साथ मिळाल्यानं वर्षाच्या उत्तरार्धात आपली प्रलंबित कामे होऊन आपण कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. स्वतःवर विश्वास ठेवावा इतकेच. ह्या वर्षात आर्थिक लाभ होण्याची संभावना असली तरी वर्षाच्या सुरूवातीस खर्चात वाढ होईल. प्रकृतीकडं दुर्लक्ष करू नये. मार्च महिन्यानंतर व्यापारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्त झाल्यानं त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मित्रांची मदत होईल. वर्षाच्या सुरूवातीस कौटुंबिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागला तरी नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतील. वर्षाच्या उत्तरार्धात नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. यावर्षात शक्य तितके स्वतःला मानसिक ताणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचा फायदा असा होईल की आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल. ऑक्टोबरनंतर आपल्या प्राप्तीत तेजी येईल. वर्षाचा उत्तरार्ध प्रणयी जीवनास अनुकूल आहे. आपला प्रेम विवाह होण्याची संभावना सुद्धा आहे. यावर्षी अनेक बाबतीत आपण नशीबवान ठराल. त्यामुळं आपल्या कामात आपण यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरूवातीस आपण परदेशात जाऊ शकता. यावर्षी आपल्या वडिलांची प्रकृती नाजूक होऊ शकते. अधून-मधून आईची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागेल. तेव्हा आपल्या आई - वडिलांची काळजी घ्या. आपण सुद्धा आपल्या आहारावर लक्ष ठेवावं. अति खाऊन आपण सुद्धा आजारी पडण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra) : २०२५ ची सुरूवात आपल्यासाठी चांगली होईल. प्रकृतीत सुधारणा होईल, परंतु पार्टीचा अतिरेक झाल्यानं पोटास त्रास होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. याला कारणीभूत कामाच्या ठिकाणी आपण दाखवलेला आपला क्रोध असेल. एखाद्याशी भांडण सुद्धा होऊ शकते. ह्या वर्षी आपणास कोणत्याही विरोधकापासून त्रस्त होण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता बिलकुल भासणार नाही. ते आपणहून स्वतःच पीछेहाट करतील. आपण आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरूवातीस आपल्यात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची जबरदस्त क्षमता असेल. आपल्या व्यापारासाठी कोणत्याही थरापर्यंत जोखीम पत्करण्यास आपण सक्षम असल्यानं व्यापारवृद्धीचा नवीन मार्ग मोकळा होईल. काही नवीन कंत्राट मिळू शकतात, तसेच काही नवीन सौदे सुद्धा होऊ शकतात. वर्षाच्या सुरूवातीस आपल्या वाणीतील गोडव्याने आपली कामे पूर्ण होऊ लागतील. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात अनुकूल आहे. आपल्या प्रणयी जीवनात आपण खूपच रोमँटिक व्हाल. आपल्या नात्यास विवाहात परिवर्तित करण्यासाठी खूप प्रयत्न सुद्धा आपण कराल. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरूवात काहीशी कमकुवतच होईल. त्यानंतर परिस्थिती आपणास अनुकूल होऊ लागेल. आपल्या सासुरवाडीशी उत्तम समन्वय साधल्याचा आपणास लाभ होईल. आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार यादरम्यान उत्तम समन्वय, रोमांस राहील. विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांची एकाग्रता खूपच कमी झाल्यानं त्यांना त्यावर लक्ष द्यावं लागेल. अन्यथा अभ्यासात त्यांना समस्यांचा सामना करावा लागेल. परदेशात जाण्यात अडथळे आले तरी वर्षाच्या मध्यास अनुकूलता लाभून परदेशात जाण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. यावर्षात आपणास आपल्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवावं लागेल, अन्यथा आपण आजारी पडण्याची संभावना आहे. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. वर्षाच्या सुरूवातीस एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपली स्थगित झालेली कामे सुद्धा हळू-हळू गतीमान होतील. त्यामुळं आपण यशस्वी व्हाल. आपणास आपल्या मामाकडून लाभ होईल. यावर्षी आपली कठीण परीक्षा सुद्धा होईल. आपण जितका आळस झटकाल तितकेच जीवनात यशस्वी होऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली असल्यानं आपल्या कारकीर्दीस स्थैर्य येऊ लागेल.
वृश्चिक (Scorpio) : या वर्षाची सुरूवात आपल्यासाठी चांगली आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर अनेक कामात यशस्वी होऊ शकाल. वैवाहिक जोवनात आपला जोडीदार आपल्या पाठीशी राहील. आपण त्यांच्यासह नवीन ठिकाणी प्रवासास जाल. तीर्थयात्रेस सुद्धा जाऊ शकता. ह्या वर्षात आपणास जोडीदाराकडून सौख्य प्राप्त झाल्यानं आपल्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. प्रेमीजनांना मात्र काहीसे सावध राहावं लागेल. आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात आवश्यकते पेक्षा जास्त हस्तक्षेप करणे आपल्यासाठी नुकसानदायी होईल. तिला आपलं वागणं अजिबात आवडणार नाही, परिणामतः ती आपल्यापासून दूर होऊ शकते. आपण जर तिला थोडं समजून घेऊन तिच्याशी संवाद साधला तर ती स्वतःहून आपल्याकडं ओढली जात असल्याचं आपणास दिसून येईल. मग आपल्यातील समन्वय उत्तम प्रकारे साधला जाईल. वर्षाच्या सुरूवातीस आपणास रोमांस करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाची सुरूवात चांगली आहे. आपणास नोकरीची नवीन संधी मिळून आपल्याला चांगली प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपली पदोन्नती संभवते, मात्र त्या आधी आपली बदली सुद्धा होऊ शकते. वर्षाच्या सुरूवातीस आपणास आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागावं लागेल, अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. ह्या वर्षात आपल्या व्यवसायाची सुद्धा प्रगती होईल. व्यापारवृद्धी होईल. काही प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपणास चांगली कामे मिळाल्यानं आपला व्यवसायात मोठी उंची गाठू शकेल. या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या सुरूवातीपासून ते मध्यापर्यंत प्रकृतीत चढ-उतार येऊ शकतात. आपण जर आपल्या प्रकृतीकडं दुर्लक्ष केलं तर एखाद्या मोठ्या समस्येस आपणास सामोरे जावं लागू शकते. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे. ते आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ घेऊ शकतील. अभ्यासात उत्तम कामगिरी होण्यासाठी त्यांना आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या वर्षाच्या मध्यास आपणास आपलं घर बदलावं लागू शकतं. आपला प्रेम विवाह होण्याची संभावना आहे. यावर्षी विवाहेच्छुकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. आपण जर परदेशात जाऊ इच्छित असाल तर जानेवारी-फेब्रुवारीत आपणास चांगली संधी मिळू शकते. कार्यक्षेत्री कोणाशीही भांडू नये. आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवलीत तर आपली खूप मोठी प्रगती होऊ शकेल.
धनु (Sagittarius) : या वर्षाची सुरूवात आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वर्षाच्या सुरूवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासादरम्यान किंवा वाहन चालवताना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वर्षाच्या सुरूवातीस एखादी दुखापत किंवा दुर्घटना होण्याची संभावना असल्यानं वाहन चालवताना सावध राहावं. आरोग्यविषयक समस्यांवर आपणास लक्ष द्यावेच लागेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी प्रयत्नशील राहावं लागेल. कारण काहीही असो आपलं कामात मन रमणार नाही आणि त्यामुळं कार्यस्थळी आपणास समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. वर्षाच्या सुरूवातीस आपले विरोधक थोडे मजबूत होण्याची शक्यता असल्यानं आपणास सुद्धा मजबूत होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा आपण चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता. वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती होऊ शकेल. विवाहितांना वर्षाच्या सुरूवातीस आपला अहं बाजूस सारावा लागेल. अहंकारामुळं त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. मात्र, त्या नंतरच्या दिवसात सुधारणा होऊन आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. हे वर्ष प्रेमीजनांकडून खूप मोठी आशा बाळगून आहे. वर्षाच्या सुरूवातीस आपल्या प्रेमिकेस एखादी आरोग्य विषयक समस्या त्रस्त करू शकते. त्यानंतर आपण तिच्यासह एखादा प्रवास करून आपले नाते अधिक दृढ कराल. आपण एकमेकांवर पूर्ण विश्वास दाखवू शकाल. वर्षाच्या मध्यास आपणास आपल्या नात्यात काही चांगले परिणाम देखील मिळू शकतात. विद्यार्थ्यांना यावर्षी कठोर परिश्रम करावं लागतील. आपण जितके जास्त परिश्रम कराल तितके चांगले परिणाम मिळवू शकाल. वर्षाच्या सुरूवातीस परदेशात जाण्याची संधी आपणास मिळू शकते. या वर्षाच्या सुरूवातीस खर्च वाढतील. आपण त्यावर नियंत्रण ठेवलं नाहीत तर आपली बचत सुद्धा संपून जाईल. त्यानंतर आपण हळू-हळू आर्थिक आव्हानातून बाहेर पडून अन्य ठिकाणाहून प्राप्ती करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकाल.
मकर (Capricorn) : २०२५ ची सुरूवात आपली परीक्षा घेणारी आहे. आपली प्रकृती नाजूक राहू शकते. व्यावहारिक गोष्टी समोर येऊ शकतात. आपण क्रोधीत होऊन आपल्या लोकांशी दुरावा निर्माण करू शकता. तसेच रागाच्या भरात असे काही बोलाल की ते आपल्यापासून दुरावले जातील. अशा स्थितीमुळं वर्षाची सुरूवात नात्यासाठी कमकुवत राहील. आपणास आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावं लागेल. वर्षाच्या सुरूवातीस परदेशात जाण्यात यश मिळू शकते. यावर्षात आपणास खर्चातील वाढ सहन करावी लागेल. हे वर्ष सामंजस्य दाखवून निर्णय घेण्याचं आहे. नोकरी करणाऱ्यांना या वर्षाच्या सुरूवातीस मोठी बचत करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्री आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. व्यापाऱ्यांना वर्षाच्या सुरूवातीस आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावं लागेल. आपले व्यावसायिक भागीदार आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी सौहार्दाने वागूनच आपण यशस्वी होऊ शकाल. व्यापारासाठी वर्षाची सुरूवात काहीशी नाजूकच आहे. अर्थात त्यानंतर परिस्थिती आपणास अनुकूल होईल. विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध खूपच चांगला आहे. अध्ययनात ज्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकेल अशा चांगल्या गोष्टी त्यांना बघावयास आणि समजण्यास मिळू शकतात. वर्षाच्या सुरूवातीस आपणास चांगली आर्थिक प्राप्ती होईल. प्रवासावर काही पैसा खर्च झाला तरी प्राप्ती चांगली होऊन बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपली आर्थिकस्थिती मजबूत होईल, ज्याचा आपण वेळोवेळी आनंद सुद्धा घेऊ शकाल. आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी राहतील. भावंडांशी आपला समन्वय उत्तम राहील. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात चांगली होईल. आपण आपल्या भावना प्रेमिकेसमोर व्यक्त करू शकाल. विवाहितांसाठी वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल असू शकते. आपसातील भांडण टाळावे. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपल्या जोडीदाराचा कुटुंबियांशी समन्वय साधण्यासाठी आपणास पुढाकार घ्यावा लागेल. आरोग्याप्रती सुद्धा आपणास जागरूक राहावं लागेल. त्यामुळं आपली प्रकृती चांगली राहून मानसिकदृष्ट्या चांगला अनुभव घ्याल. आपण चांगला निर्णय घेऊन आपले जीवनमान उंचावू शकाल. विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरूवातीपासून चांगले परिणाम मिळू लागले तरी त्यांना सातत्य टिकवून ठेवावं लागेल. मकर राशीवरील शनिचा प्रभाव दूर होणार आहे. मकर राशीची साडेसाठी संपणार आहे.
कुंभ (Aquarius) : वर्षाची सुरूवात आपल्यासाठी चांगली होणार आहे. विवाहितांसाठी वर्षाची सुरूवात चांगली आहे. प्रेम आणि रोमांस झाला तरी उत्तरार्धात तणाव वाढू शकतो. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल आहे. प्रणयी जीवनात आपणास अत्यंत सावध राहावं लागेल. आपण एक सांगाल आणि त्याचा भलताच अर्थ आपली प्रेमिका काढेल. असं झाल्यानं आपल्यात गैरसमज निर्माण होतील. मात्र, उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होऊन आपले नाते दृढ होईल. शनिदेवांच्या कृपेने आपली कामे होतील. पैश्यांची कमतरता भासणार नाही. आपण कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकाल. आपल्या हिंमतीहून काहीही मोठे असणार नाही. त्यामुळे आपण प्रत्येक आव्हानाचा स्वीकार करून वाटचाल कराल. वर्षाच्या सुरूवातीस सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांचे वरिष्ठ त्यांच्या पाठीशी राहतील. ते आपल्यावर नजर ठेवून आपली पगारवाढ सुद्धा करू शकतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आवडत्या ठिकाणी बदली सुद्धा मिळू शकते. आपली कार्यालयीन स्थिती चांगली राहील. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवून आपली कामगिरी उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल, त्यामुळं आपली दैनंदिन कामगिरी उत्तम होत जाईल. आपण खूप परिश्रम कराल. व्यावसायिक लोक नवीन सौदे करण्यावर भर देतील. सरकारी क्षेत्राशी संपर्क स्थापित करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल, त्यामुळं शासकीय कामे करण्याची सुद्धा नवीन संधी मिळू शकेल. या वर्षी आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा फायदा होईल. यावर्षी आपणास धनलाभ उत्तम होईल. आजवर आपण जे कष्ट केलेत त्यातून जी काही प्राप्ती होईल त्याची योग्य रीतीने गुंतवणूक आपण करू शकाल. एखाद्या नवीन बचत योजनेत सुद्धा पैसे गुंतवाल, किंवा एखाद्या म्युच्युअल फंडात किंवा शेअर्स बाजारात सुद्धा गुंतवणूक कराल. यावर्षी आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरूवात चांगली आहे. कुटुंबात समन्वय उत्तम असल्यानं कौटुंबिक वातावरण सुद्धा खूपच सुखद राहील. या वर्षाच्या सुरूवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मीन (Pisces) : या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी काहीशी प्रतिकूल असू शकते. आपल्या जीवनात खूप चढ-उतार येणार आहेत. त्यासाठी आपणास आत्तापासूनच तयारी करावी लागेल. या वर्षाच्या सुरूवाती पासूनच आपले व्यक्तिगत जीवन, आपले आरोग्य आणि आपली आर्थिक स्थिती अशा तिन्ही गोष्टींवर आपणास लक्ष द्यावं लागेल. ह्या तिन्ही क्षेत्रात चढ-उतारांचा सामना आपणास करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरूवातीपासूनच आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपणास पाय दुखी, टाचेचे दुखणे, नेत्र समस्या, एखादा संसर्ग आणि यकृताशी संबंधित समस्या त्रस्त करू शकतात. सुरूवातीस कदाचित या समस्या सौम्य प्रमाणात असू शकतात, परंतु आपण जर त्याकडं दुर्लक्ष केलेत तर आपणास मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरूवातीस खर्चात वाढ होऊन आपल्या बचतीवर त्याचा परिणाम होत असल्याचं दिसून येईल. त्यामुळं आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. योग्य आर्थिक नियोजन करून आपणास आर्थिक बाजू सांभाळावी लागेल. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल आहे. आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार ह्या दरम्यान गैरसमजाचा अतिरेक झाल्यानं आपले वैवाहिक नाते काहीसे गढूळ होईल. अशास्थितीत थोडं सावध राहावं लागेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा पाठिंबा आपल्या कामी येईल, जी निव्वळ आपले नाते वाचवणार नाही तर त्यात सुधारणा करण्यासाठी मदत सुद्धा करेल. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरूवात काहीशी प्रतिकूल आहे. आपण आणि आपल्या प्रेमिके दरम्यान गैरसमजाहून जास्त अहंकाराशी संबंधितबाबी राहतील. ती जास्त क्रोधीत होऊन आपणास त्रास देईल. त्यामुळं आपल्या नात्याचा धागा काहीसा कमकुवत होऊ शकतो. कारकिर्दीच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या सुरूवातीस उत्तम यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना मात्र काही त्रास सोसावा लागू शकतो. व्यावसायिक भागीदारी तुटू शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरूवात काहीशी त्रासदायी असेल. असं असलं तरी वर्षाच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल, जी वर्ष अखेरपर्यंत सुरूच राहील. वर्षाच्या सुरूवातीच्या काही महिन्यात परदेशात जाण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपण जर त्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपणास यश नक्कीच मिळेल. मात्र, खर्च भरमसाठ वाढतील. त्यावर आपणास लक्ष ठेवावं लागेल. आपल्या सभोवतालच्या लोकांवर नजर ठेवावी. त्यातील काहीजण आपला गैरफायदा घेण्याची संभावना आहे.
हेही वाचा -
यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व