नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 :देशभरात नीट पेपर लिक प्रकरणावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. नीट लिक प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही उमटले. नीट पेपर लिक प्रकरणावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सरकारकडं मागणी करण्यात आली. मात्र नीट पेपर लिक प्रकरणावर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्यानं विरोधकांनी मोठा गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा अध्यक्षानी सभागृह स्थगित केलं. यावेळी विरोधकांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभेत मोठी घोषणाबाजी केली.
नीट पेपर लिक प्रकरणावर चर्चेची मागणी :देशभरात नीट पेपर लिक प्रकरणावरुन मोठं रान उठलं आहे. त्यातच आज संसदेत विरोधकांनी आक्रमक होत या प्रकरणी चर्चेची मागणी केली. यावेळी विरोधकांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मोठी घोषणाबाजी केली. गुरुवारी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा अधिवेशन 2024 मध्ये आज NEET पेपर लिक प्रकरणावर चर्चा करायची यावर विरोधकांचं एकमत झालं आहे. सभागृहात नीट पेपर लिक प्रकरणावर चर्चा व्हायला हवी. हा लाखो तरुणांशी निगडीत असलेला प्रश्न आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो, त्यांनीही या चर्चेत सहभागी व्हायला हवं, असं राहुल गांधी यांनी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी वृत्तसंस्थेला बोलताना स्पष्ट केलं.