कोलकात्ता Kolkata Doctor Murder Case :आरजी कार डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरण आता सीबीआयकडं सोपवण्यात आलं आहे. सीबीआयनं या प्रकरणातील चौकशीला सुरुवात केली. सीबीआयनं या प्रकरणातील पीडितेच्या पालकांची भेट घेतली. यावेळी पीडितेच्या पालकांनी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टरांचा सहभाग असल्याचा आरोप सीबीआयकडं केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितेच्या पालकांनी इटर्न डॉक्टरांवर आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या पालकांनी इंटर्न डॉक्टरांची सीबीआयला दिली नावं :पीडित पालकांची भेट घेतल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, "पीडित डॉक्टरच्या पालकांनी काही इंटर्न डॉक्टरांवर या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संशयित इटर्न डॉक्टरांची नावं त्यांनी आमच्याकडं दिली आहेत. त्यामुळे सीबीआयनं 29 संशयितांच्या नावांची यादी बनवली आहे," असं स्पष्ट केलं. पीडितेच्या पालकांनी आरजी कार रुग्णालयाच्या काीह इंटर्न डॉक्टरांची नावं संशयित म्हणून घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे या घटनेची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.