मुंबई - बांगलादेशात सध्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरता पसरलेली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून आपल्या देशात मोर्चे अन् निषेध आंदोलनं निघत आहेत. याबाबत भारत सरकारनेदेखील भूमिका स्पष्ट केलीय. परंतु या सगळ्यात बांगलादेशातील दलित आणि चकमा समुदायावरील अत्याचार दुर्लक्षित होत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रदेखील लिहिले असून, हिंदूंवरील अत्याचाराप्रमाणेच दलितांवरील अत्याचाराबाबतदेखील ठोस पावले उचलावीत, अशी विनंती केलीय.
भारत सरकारने घेतलेली भूमिका निश्चितच कौस्तुकास्पद : प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याक अशा आदिवासी लोकांविरुद्ध यात विशेषतः बौद्ध आणि चकमा समुदायाविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत भारत सरकारने घेतलेली भूमिका निश्चितच कौस्तुकास्पद आहे. पण बौद्ध आणि चकमा या अल्पसंख्याक समुदायाविषयी भारत सरकारकडून अद्याप भूमिका घेण्यात आलेली नाही. बांगलादेशात बौद्ध आणि चकमा समुदायाला हिंसाचार आणि भेदभावाला तोंड द्यावे लागत असून, मला त्याबद्दल काळजी वाटत असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचं दुर्लक्ष : प्रकाश आंबेडकर पुढे लिहितात की, "या दोन्ही समुदायांच्या मदतीसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करण्याच्या विनंतीकडे सरकार आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलंय. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना त्यांच्या पदावरून अनैतिकरीत्या काढून टाकल्यापासून, मी बौद्धांवरील हल्ले, त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड, बांगलादेशातील त्यांच्या मालमत्तेची तोडफोड आणि चितगाव डोंगराळ भागात स्थानिक चकमा गटांवर हल्ले आणि त्यांची दुकाने, घरे जाळणे यांसारख्या त्रासदायक घटना घडलेल्या पाहिल्यात," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सुरक्षेसाठी भारत सरकारने उपाययोजना कराव्यात : "बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अल्पसंख्याक असलेल्या बौद्धांवर सुरू असलेले हल्ले हे 2012 मधील रामू हिंसाचाराचे प्रतिध्वनी आहेत. बांगलादेशातील दलित, बौद्ध, चकमा समुदायाची सध्याची अवस्था पाहता आणि बांगलादेशातील सध्याची परिस्थिती आणि तेथील या लोकांच्या मदतीची तीव्रता लक्षात घेता या समुदायांच्या मदतीसाठी तात्काळ धोरणे राबवून आवश्यक ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे. या लोकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने उपाययोजना कराव्यात," अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलीय.
हेही वाचा-