लखनौ : कासगंज येथील तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ता याचा गोळीबारात मृत्यू झाल्याप्रकरणी आज एनआयए न्यायालयानं सर्व २८ दोषींना शिक्षा सुनावली. गुरुवारी न्यायालयानं आसिफ कुरेशी हिटलर, अस्लम कुरेशी, शबाब या दोषींसह 28 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कासगंज ABVP कार्यकर्ता चंदन गुप्ता हत्येप्रकरणी NIA कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा - CHANDAN GUPTA MURDER CASE
26 जानेवारी 2018 रोजी तिरंगा यात्रेत चंदन गुप्ता याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आज कोर्टानं २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा दिली.
Published : Jan 3, 2025, 4:50 PM IST
26 जानेवारी 2018 रोजी ABVP कार्यकर्ता चंदन गुप्ताने कासगंजमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांसोबत तिरंगा यात्रा काढली होती. या यात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. ही यात्रा बद्दुनगर या मुस्लिमबहुल भागातून जाऊ लागली तेव्हा मुस्लिम समाजाच्या लोकांनी या यात्रेला विरोध केला. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली आणि काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, चंदन गुप्ता याच्यावर गोळी झाडण्यात आली. जखमी अवस्थेत चंदन गुप्ता याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
लखनौ येथील एनआयए न्यायालयात सहा वर्षे या संदर्भातील खटला चालवला होता. आता या प्रकरणात २ जानेवारी म्हणजेच काल रोजी न्यायालयाने २८ आरोपींना कलम १४७, १४८, ३०७/१४९, ३०२/१४९, ३४१, ३३६, ५०४, ५०६ अंतर्गत दोषी घोषित केलं होतं. तर या प्रकरणी नसरुद्दीन आणि असीम कुरेशी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषी ठरलेल्या आरोपींमध्ये अजीजुद्दीन, मुनाजीर, सलीम, नसीम, आसिफ, इम्रान सलमान, अस्लम, शबाब, साकिब, आमिर रफी, वसीम, बबलू, अक्रम, तौफिक, मोहसीन, राहत, आसिफ, निशू, वासीफ, शमशाद, जफर यांचा समावेश आहे. तसंच खालिद परवेझ, फैजान, इम्रान, शाकीर, जाहिद यांचाही समावेश आहे. यातील एक आरोपी अजीजुद्दीनचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने २८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.