हैदराबाद Lok Sabha Election :लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सध्या देशभरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्त्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात लोकसभा निवडणुकीत तीन महिलांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या लोकसभा निवडणूक या तीन महिलांमुळे चांगलीच चर्चेत आहे. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे.
सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन सुनेत्रा पवारांची सुप्रिया सुळेंना टक्कर :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन वेगली चूल मांडली आहे. निवडणूक आयोगानं त्यांना खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्या कन्या तथा त्यांची नणंद सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली आहे. सध्या बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद भावजयात सरळ लढत होत आहे. या लढतीकडं देशाचं लक्ष लागलं आहे. या लढतीमुळे सुनेत्रा पवार या राजकारणातील चर्चेतील चेहरा म्हणून पुढं आल्या आहेत.
'इंडिया'च्या महारॅलीत सुनिता केजरीवाल आणि कल्पना सोरेन :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं दिल्ली दारू घोटाळ्यात अटक केली आहे. सध्या अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या तिहार कारागृहात बंदिस्त आहेत. तर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही विविध घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ 'इंडिया' आघाडीनं दिल्लीत महारॅलीचं आयोजन केलं होतं. या महारॅलीत सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. सध्या या दोघींची नावं पक्षाच्या अधिकृत नेत्यांच्या यादीत नाहीत. मात्र या दोघीही राजकीय भूमिका घेण्यास सज्ज असल्याचं त्यांच्या आंदोलनातील भूमिकेवरुन स्पष्ट झालं आहे.
सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांची भेट :आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसाठी दिल्लीत महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीनंतर सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांची भेट झाली. त्यानंतर या दोघींनी बराच वेळ चर्चा केल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्या महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
- अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नणंद-भावजयांचा प्रचार सुरू; दोघींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास - Supriya vs Sunetra
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीकरांना खास संदेश; म्हणाले... - Cm Kejriwal Message to Delhi People
- झारखंडचे मुख्यमंत्री राजीनामा देणार? हेमंत सोरेन यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याच्या चर्चा; काय आहे प्रकरण