श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी (20 ऑक्टोबर) रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी स्थानिक आणि परराज्यातील मजुरांवर गोळीबार केला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सैनिकांनी सदरील परिसराची नाकेबंदी केली आहे.
- दहशतवाद्यांना सोडणार नाही :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. "या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडणार नाही. तसंच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या जोरदार प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल," असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला काय म्हणाले? : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मजुरांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केलाय. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले की, "कामगार हे परिसरातील एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2-3 जण जखमी झाले आहेत. मी नि:शस्त्र निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो." गंभीर जखमींना SKIMS श्रीनगर येथे पाठविण्यात आलं आहे. जखमी बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.