रायपूर : नक्षलवाद्यांचा पुन्हा क्रूर चेहरा पुढं आला आहे. गावातली माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. सुक्कू हापका असं नक्षलवाद्यांनी खबरी असल्याच्या संशयातून हत्या केलेल्या गावकऱ्याचं नाव आहे. ही घटना मिरतूर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली असून नक्षलवाद्यांनी सुक्कू हापका यांच्यावर खबरी असल्याचा ठपका ठेवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या : नक्षलवाद्यांनी गावकऱ्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला. नक्षलवाद्यांनी प्रथम सुक्कू हापकाचे त्याच्या घरातून अपहरण केलं. त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले. सुक्कू हापकाचा मृतदेह गावकऱ्यांना शोधला. यावेळी गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षलवाद्यांचं एक पत्रक जप्त केलं आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकात मृत गावकरी सुक्कू हापका हा पोलिसांचा खबरी होता, असा आरोप केला. नक्षलवाद्यांच्या भरमगड समितीनं घटनास्थळी नक्षलवादी पत्रक फेकलं.
पोलिसांकडून नक्षलवाद्यांची शोध मोहीम : नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजापूरसह 7 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आतापर्यंत 68 गावकऱ्यांची हत्या केली. त्यासह वर्षाच्या सुरुवातीला नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या हल्ल्यात 8 डीआरजी जवानांना वीरमरण आलं. नक्षलविरोधी कारवाई केल्यानंतर डीआरजी जवान एका वाहनातून परतत होते. कुत्रूमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणला. जवानांना घेऊन जाणारं वाहन आयईडीजवळ पोहोचताच स्फोट झाला. बॉम्बस्फोटात वाहनाच्या चालकासह 8 जवानांना वीरमरण आलं.
जवानांनी केला 12 नक्षलवाद्यांचा खात्मा : बिजापूर आणि सुकमाच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत जवानांना मोठं यश मिळालं. जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं. सीमावर्ती भागात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तीन जिल्ह्यांतील डीआरजी जवानांनी या परिसराला वेढा घातला. गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह विजापूरमधील नाम्बी कॅम्पमध्ये आणले.
मुख्यमंत्र्यांचं नक्षलवाद्यांना आवाहन : मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांना शस्त्रं खाली ठेवण्याचं आवाहन केलं. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि एका सामान्य गावकऱ्यासारखं जीवन जगा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. हिंसाचाराचा अवलंब करून कोणतीही समस्या सुटणार नाही. हिंसाचारामुळे बस्तरचा विकास थांबून तुमचं आणि कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :