मुंबई Inter State Child Selling Racket :मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय मुलं विक्री करणाऱ्या रॅकटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी फर्टीलिटी एजंट आणि एग डोनर तीन महिलांना सोमवारी अटक केली. या प्रकरणी अहमदनगर आणि हैदराबाद इथून दोन मुलांची सुटका करण्यात आली. आतापर्यंत या गुन्ह्यात 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तीन महिला एजंटना आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांनी आंध्रप्रदेशातून आणखी चार महिला एजंटना ताब्यात घेतलं आहे.
तीन महिला एजंटना नऊ दिवसांची पोलीस कोठडी :मुंबई पोलिसांनी तीन महिलांना सोमवारी मुलं विक्री करण्याच्या प्रकरणात अटक केली होती. या आरोपी महिलांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना न्यायालयानं 9 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या महिलांनी अहमदनगरमध्ये एका चिमुकल्याची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासह त्यांनी तेलंगाणाची राजधानी हैदराबाद इथही एका बाळाला विकलं होतं. पोलिसांनी अहमदनगर आणि हैदराबाद इथून या बाळांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची रवानगी बालविकास समितीकडं करण्यात आली आहे.
विशाखापट्टणम इथून चार महिलांना घेतलं ताब्यात :मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी संचालनालयानं सोमवारी आंतरराज्यीय मुलं विक्री टोळी प्रकरणी विशाखापट्टणम इथं छापेमारी केली. यावेळी मुंबई पोलिसांनी चार महिला एजंटना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या महिला या एग डोनर म्हणून काम करणाऱ्या आहेत. पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईला आणलं जात आहे. या रॅकेटनं प्रत्येक मुलांसाठी 80 हजार रुपये ते 4 लाख रुपयांमध्ये मुलांची विक्री केली. या चिमुकल्यांच्या पालकांना 30 हजार ते 60 रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
आतापर्यंत 14 बालकांना विकल्याचं उघड :मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या आंतरराज्याजीय रॅकेटनं आतापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचं उघड झालं आहे. ही बालकं मुंबई, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात विक्री करण्यात आल्याचं या पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला सांगितलं. हे रॅकेट सप्टेंबर 2022 पासून मुलं विक्री करत असल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी एका डॉक्टरसह सहा आरोपींना अटक करुन विकण्यात आलेल्या दोन चिमुकल्यांची सुटका केली होती.
हेही वाचा :
- बालकांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, डॉक्टरसह दहा जणांना अटक - Child Trafficking Case Mumbai
- नवजात बालकांची पाच लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी - Child Trafficking Pune