नवी दिल्ली Income Tax Notice Congress : आयकर विभागानं पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवलीय. या नोटीसमध्ये पक्षाकडून 1700 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाची मागणी नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी आहे. या 1700 कोटी रुपयांच्या रकमेचा दंड आणि व्याजाचा समावेश आहे. आयकर विभागाच्या नोटीसमुळं 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
न्यायालयानं कॉंग्रेसची याचिका फेटाळली : काँग्रेसनं 2017-2021 च्या आयकर विभागाच्या दंडाची फेरतपासणी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, न्यायालयानं काँग्रेसची याचिका फेटाळली. यानंतर पक्षाला नोटीस पाठवण्यात आलीय. आता काँग्रेस पक्ष आणखी तीन वर्षांच्या उत्पन्नाची चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहात आहे. रविवारपर्यंत हा तपास पूर्ण होईल. काँग्रेसचे वकील आणि राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. आयकर विभागाची कारवाई अनावश्यक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.