हरदाHarda Blast : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. शहरातील मगरधा रोडवर असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात ही घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागला आहे.
50 हून अधिक घरांना भीषण आग :फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे जवळपास 50 हून अधिक घरांना भीषण आग लागलीय. कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की, आवाज ऐकताच लोक पळून जाताना दिसत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
- मुख्यमंत्र्यांनी घेतली घटनेची माहिती :हरदा येथील फटाका कारखान्यात झालेल्या भीषण अपघातावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव लक्ष ठेवून आहेत. तसंच सीएम यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे.
- जिल्हा प्रशासन सतर्क :स्फोटानंतर आगीनं मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केलं आहे. त्यामुळं 50 हून अधिक घरांना त्याचा फटका बसलाय. स्फोटानंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. कारखान्यातून ज्वालासह धूराटे लोळ आकाशाला भिडताना दिसताय. या दुर्घटनेमुळं संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे.
- इतर जिल्ह्यातील अग्निशमन दलालाही पाचारण :फटाक्यांच्या कारखान्याला लागलेली आग भीषण असल्यानं आजूबाजूच्या जिल्ह्यातील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं आहे. नर्मदापुरम, भोपाळ, बैतूल, सिहोर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे.